जि.प.च्या १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By Admin | Updated: September 5, 2014 00:15 IST2014-09-04T23:42:49+5:302014-09-05T00:15:11+5:30
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ९ प्राथमिक, ३ माध्यमिक व एक विशेष शिक्षक अशा १३ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत.

जि.प.च्या १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ९ प्राथमिक, ३ माध्यमिक व एक विशेष शिक्षक अशा १३ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षकांची निवड करुन शिक्षक दिनी त्यांना गौरविले जाते. यावर्षी प्राथमिक विभागातून प्रभू गोविंदराव मोरे (सायाळा, ता.परभणी), सायस सखाराम नाईकवाडे (खळी, ता.गंगाखेड), रामराव दिनाजी मोरतळे (धानोरा मोत्या, ता.पूर्णा), मारोती दत्तराव घुगे (साखरतळा, ता.जिंतूर), प्रकाश मल्लिकार्जून मोहकरे (इरळद, ता. मानवत), हरिभाऊ अण्णासाहेब हरकळ (नामदेवनगर, पाथरी), मोहन सदाशिव कोत्तावार (तिडीपिंपळगाव, ता. सेलू), काजी नसिरोद्दीन सफियोद्दीन (आनंदवाडी ता.पालम), मदन आश्रोबा साठे (सोनपेठ) या नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
त्याचप्रमाणे माध्यमिक विभागातून सुधीर यशवंतराव वैद्य (बोरी, ता. जिंतूर), संजय भगवान सोनटक्के (मानवत), निवृत्ती राधाकिशन गोरवे (शेळगाव, ता. सोनपेठ) या तीन तर विशेष शिक्षक गटातून प्रेमराज नामदेव मुदाने (ता.पालम) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिंतूर रोडवरील सखा गार्डन येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)