जैस्वाल, दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार
By Admin | Updated: November 2, 2014 00:23 IST2014-11-02T00:14:11+5:302014-11-02T00:23:24+5:30
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येत असून आठ दिवसांत त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत.

जैस्वाल, दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येत असून आठ दिवसांत त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. जैस्वाल, दानवे यांना संघटन बांधणीच्या कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिवाळी भेटीत केल्या आहेत.
जैस्वालांचे पुनर्वसन कसे करणार, दानवे यांचे पक्ष अस्तित्व काय आहे, तर दाशरथे यांच्याकडेच जबाबदारी जाणार का, अशा चर्चांना सध्या पक्षात ऊत आला आहे. जिल्हाप्रमुखपदावरून उलट- सुलट चर्चा सुरू आहेत.
जैस्वाल मध्य, तर दानवे हे गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढले व ते दोघेही पराभूत झाले. मात्र, या जोडीचे संघटन बांधणीत योगदान महत्त्वाचे ठरेल, असे पक्षप्रमुखांना वाटत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी दोघांनाही संघटनेचे काम करण्यासाठी सूचना केल्याचे कळते. दानवे यांना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे आदेश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात दिले आहेत. मात्र, दानवे यांनी याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही.
गंगापूर मतदारसंघाच्या दौऱ्यानंतर ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. माजी आ. माने यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर पक्षातील वातावरण गढूळ झाले आहे. जैस्वाल, दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या दिवशी भेट घेतली. पक्षातील कुणी काम केले, कुणी गद्दारी केली, याची माहिती दोघांनीही ठाकरे यांना दिलेली आहे. विधान परिषद सदस्यपद मिळावे, अशी जैस्वाल समर्थकांची मागणी असून ठाकरे यांच्यापर्यंत ती मागणी लावून धरण्यासाठी एक गट सक्रिय झाल्याचे कळते.