शिल्लक पाण्यासाठी चर खोदण्याचा विचार
By Admin | Updated: June 29, 2016 01:02 IST2016-06-29T00:30:32+5:302016-06-29T01:02:33+5:30
औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही

शिल्लक पाण्यासाठी चर खोदण्याचा विचार
औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला आहे. पाऊस पडला नाही, तर प्रकल्पात चर खोदून भूगर्भातील शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागातील सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ मार्चपासून पाणी उपसा सुरू आहे. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे किती पाणी शिल्लक आहे. याचा अंदाज बांधणे अवघड आहे.
जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प, तर ९० लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पामध्ये १.२१ दलघमी तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ २.११ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा एकूणच टंचाईच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्याचे नियोजन काय असेल याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईवर आयोजित बैठकीत चर्चा होणार आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहर तसेच काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे.
सध्या औरंगाबाद व जालना शहराला दररोज १७० एमएलडी (०.१७ दलघमी) तर उद्योगांसाठी ५६ एमएलडी (०.५ दलघमी) पाणीपुरवठा करण्यात येतो, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे उपशातून मद्य व इतर उद्योगांसाठीच्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात करण्यात आली आहे.