‘आयसीटी’चे औरंगाबादेत उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 01:51 IST2016-04-16T01:19:28+5:302016-04-16T01:51:32+5:30
औरंगाबाद : इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेचे उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन केले जाईल, अशी घोषणा ‘आयसीटी’चे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव यांनी शुक्रवारी येथे केली

‘आयसीटी’चे औरंगाबादेत उपकेंद्र
औरंगाबाद : इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेचे उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन केले जाईल, अशी घोषणा ‘आयसीटी’चे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव यांनी शुक्रवारी येथे केली. राज्य सरकार आणि केंद्रीय मनुष्यबळ खात्याची परवानगी मिळताच उपकेंद्राच्या स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे मार्च महिन्यात झालेल्या ‘आयसीटी’च्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत उपकेंद्र स्थापन करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर पद्मश्री डॉ. यादव यांनी औरंगाबाद व जालन्याला भेट दिली. ‘सीएमआयए’च्या कार्यालयात त्यांनी उद्योजक, ‘आयसीटी’चे माजी विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. ज्येष्ठ उद्योजक मुकुंद भोगले, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकीळ, भाजपचे राज्य सरचिटणीस मनोज पांगरकर, उपमहापौर प्रमोद राठोड, जी.डी. अग्रवाल, उमेश दाशरथी, रितेश मिश्रा, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, ‘शासकीय अभियांत्रिकी’चे प्राचार्य डॉ. पी.एस. अडवाणी, प्रा. आर.एम. दमगीर, बापू घडामोडे आदी यावेळी उपस्थित होते.
‘आयसीटी’चे उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन केले जाईल. ‘आयसीटी’च्या संचालक मंडळाने त्यासाठी मान्यता दिली आहे. आता केंद्र सरकार व केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या परवानगीची गरज आहे. परवानगी मिळताच उपकेंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. जेवढ्या लवकर परवानगी मिळेल तेवढ्या लवकर याबाबतची कार्यवाही केली जाईल. मे महिन्यापूर्वी परवानगी मिळाल्यास जूनच्या अखेरपर्यंत आम्ही अभ्यासक्रम सुरू करू शकतो, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.
‘आयसीटी’ला औरंगाबादेत २०० एकर जागेची गरज आहे. ‘डीएमआयसी’ परिसरात ही जागा सहजपणे उपलब्ध होऊ शकते. ‘डीएमआयसी’मुळे तयार होणाऱ्या स्मार्ट सिटीत जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्रही असणार आहे. याचा फायदा नियोजित उपकेंद्रास होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीची (यूडीसीटी) स्थापना १९३३ या वर्षी झाली. २००८ या वर्षी ‘यूडीसीटी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला.
इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी या नावाने ही संस्था ओळखली जाते. रसायन अभियांत्रिकी, रसायन तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या विविध शाखांतील संशोधक घडविण्याचे कार्य ही संस्था करते.
संशोधनाबाबत देशात अव्वल क्रमांकावर असणारी ही संस्था जागतिक स्तरावरील चौथ्या क्रमांकाची संस्था आहे. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या संस्थेचे औरंगाबादेत उपकेंद्र स्थापन झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल.
संशोधन कार्याच्या विस्तारासाठी ‘आयसीटी’ला आर्थिक मदत करण्याचे आवाहन डॉ. यादव यांनी केले होते. त्याला उद्योजकांनी प्रतिसाद दिला. उमेश दाशरथी यांनी दहा लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली.
४एका विद्यार्थ्याचा पीएच.डी.चा खर्च उचलण्याची तयारी मुकुंद भोगले, रितेश मिश्रा, प्रसाद कोकीळ यांनी दाखविली. ‘आयसीटी’तून ‘पीएच.डी.’ करण्यासाठी साधारणत: साडेचार लाख रुपयांचा खर्च येतो, हे विशेष.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत करण्याची घोषणा झाली होती. पुढे ही संस्था विदर्भाने पळविली. ‘आयसीटी’चे ‘आयआयएम’ होईल काय, असा प्रश्न विचारला असता, यादव यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
४ ‘आयसीटी’चे उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन करण्याची सूचना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार पाहणी करण्यासाठी येथे आलो होतो.
४ ‘आयसीटी’च्या संचालक मंडळानेही औरंगाबाद उपकेंद्रास मान्यता दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद शहरात जागोजागी कचरा पडल्याचे दिसून आले. कचऱ्यावर प्रक्रिया करून हे शहर सुंदर बनायला हवे.
४ कचरा कोणताही असो, त्यावर प्रक्रिया करून त्याचे टिकावू वस्तूत रूपांतर झालेच पाहिजे. हेच तंत्र ‘केमिकल टेक्नॉलॉजी’तून शिकविले जाते. ‘आयसीटी’च्या उपकेंद्रामुळे औरंगाबादही स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.