‘आयसीटी’ उद्योजक व संशोधक बनविण्याची ‘फॅक्टरीच’..!
By Admin | Updated: October 18, 2016 00:03 IST2016-10-18T00:01:22+5:302016-10-18T00:03:12+5:30
जालना देशात प्रथम आणि जगभरात तिसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने अनेक नामवंत उद्योजक आणि संशोधक घडविले आहेत.

‘आयसीटी’ उद्योजक व संशोधक बनविण्याची ‘फॅक्टरीच’..!
राजेश भिसे जालना
देशात प्रथम आणि जगभरात तिसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने अनेक नामवंत उद्योजक आणि संशोधक घडविले आहेत. ही संस्था म्हणजे या दोन्ही बाबींची फॅक्टरीच असल्याचे मत अभियंता आशीष मंत्री यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेच्या महाविद्यालयास जालन्यात शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर याच महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले आणि प्रथितयश उद्योजक आशीष मंत्री यांनी लोकमतशी मनमोकळा संवाद साधला. या महाविद्यालयाचा जालन्यासह मराठवाड्यातील मुलांना आणि कृषीसह विविध क्षेत्रांना होणारा फायदा यावर आपली स्पष्ट मते नोंदवली. उद्योजकतेसह नावीन्यनिर्मिती वा नवीन उपक्रम तयार करण्याची वृत्ती वाढीस लागेल. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यासह महाराष्ट्राचे निसर्गचक्र बिघडले आहे. यावर मात करण्यासाठी देशात संशोधन वा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवायला हवा. आता अमेरिका वा युरोपीय तंत्रज्ञान वा संशोधन उपयोगी पडणार नाही. चांगले संशोधन मराठवाड्यात झाले तर आगामी काळात कृषी क्षेत्रातील संकटे दूर होऊन नवीन संधी निर्माण होतील. तसेच नवनवीन प्रयोगांमुळे उत्पादन वाढून समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतील. कृषी, औषधी निर्माणशास्त्र, रसायन, वस्त्रोद्योग, विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग आदींबाबतचे परिपूर्ण ज्ञान हे या संस्थेतून विविध अभ्यासक्रमांद्वारे दिले जाते. उद्योग क्षेत्रातील नामवंत आणि प्रथित यश मिळविलेले उद्योगपती मुकेश अंबानी (रिलायन्स, १९७४), अश्विन दाणी(ऐशियन पेण्टस् १९५८), डॉ. रेड्डी (रेड्डी फार्मास्युटीकल्स), डॉ. दर्डा (दर्डा केमिकल्स) यासारखी असंख्य नावे आहेत. ज्यांनी या संस्थेतून शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यानंतर उद्योग वा नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा केवळ देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात उमटवला आहे. आयसीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्य कल्पना व नावीन्यपूर्ण निर्मिती एक नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार असून, राज्याच्या विकासास मोलाचा हातभार लागेल, असा विश्वास आशीष मंत्री यांनी व्यक्त केला.