‘आयएएस’चा रस्ता खडतर, पण अशक्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 23:13 IST2017-04-04T23:10:44+5:302017-04-04T23:13:04+5:30
लातूरनिलंगा तालुक्यातील मूळचा नणंद येथील असलेल्या गजानन लादेने आयएएस पदाचा रस्ता खडतर असला, तरी तो अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे

‘आयएएस’चा रस्ता खडतर, पण अशक्य नाही
राजकुमार जोंधळे लातूर
निलंगा तालुक्यातील मूळचा नणंद येथील असलेल्या गजानन लादेने आयएएस पदाचा रस्ता खडतर असला, तरी तो अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे. नियोजनबद्ध अभ्यास आणि कष्टाची तयारी ठेवल्यानंतर ग्रामीण भागातील मुलंही या क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी दाखवू शकतात, असे आयएएसमध्ये देशात ४३ वा आलेल्या गजानन लादे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेसाठी अभ्यासक्रमाची चौकट असते. या चौकटीबाहेर जाऊन तयारी केल्यास हमखास यश मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे अचूक नियोजन करावे लागते. त्यासाठी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सकारात्मक तयारी महत्त्वाची असते. दररोज किमान १० तास अभ्यास केल्यास आयएएससारख्या अवघड वाटेवरही यशाचा झेंडा फडकविता येतो. गजानन लादे यांचे लातूरच्या श्री देशीकेंद्र शाळेत प्राथमिक शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजस्थानमधील कोटा येथे झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील वरंगल येथे त्यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेतून बीटेकची पदवी संपादित केली. बीटेकचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी किमान १० तास अभ्यास केला.
अभ्यासात सातत्यपूर्ण असेल तर देशपातळीवरील आयएएससारख्या परीक्षेतही यश मिळविता येते. त्यासाठी पदवीपासूनच या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागेल, असेही ते म्हणाले.