‘आयएएस’साठी आठशे तरुणांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: November 7, 2016 01:08 IST2016-11-07T00:41:01+5:302016-11-07T01:08:36+5:30
औरंगाबाद : भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी आज रविवारी शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात आली

‘आयएएस’साठी आठशे तरुणांनी दिली परीक्षा
औरंगाबाद : भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी आज रविवारी शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात आली. ८०० विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत ही परीक्षा दिली.
औरंगाबादेतील भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता यांनी सांगितले की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रातील तरुणांचे प्रमाण वाढावे, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून राज्यात औरंगाबाद, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती व नाशिक या सहा ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. उच्च व तंत्रनिकेतन विभागामार्फत चालविण्यात येणारे औरंगाबादेतील हे केंद्र शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाजवळ आहे. या प्रशिक्षण केंद्रामधून विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपये विद्यावेतन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, आदी सोयी नि:शुल्क पुरविल्या जातात. औरंगाबाद केंद्रामध्ये एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापैकी खुल्या प्रवर्गातील ६० विद्यार्थी, ‘बार्टी’मार्फत अर्थात मागास प्रवर्गातील १० आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गुणवत्ता आणि आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.