ओएलएक्सपर सब बेच दुंगा, नव्हे.. सब पैसे खिच लूंगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:26+5:302020-12-17T04:26:26+5:30
औरंगाबाद: ओएलक्सवर टेबल आणि स्टॅण्ड विक्रीची जाहिरात टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. टेबल खरेदी करण्याची थाप मारत ...

ओएलएक्सपर सब बेच दुंगा, नव्हे.. सब पैसे खिच लूंगा...
औरंगाबाद: ओएलक्सवर टेबल आणि स्टॅण्ड विक्रीची जाहिरात टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. टेबल खरेदी करण्याची थाप मारत सायबर गुन्हेगाराने क्यू. आर. कोड पाठवून तिच्या बॅंक खात्यातील २ लाख ९५ हजार ५०३ रुपये परस्पर ऑनलाईन काढून घेतले. ६ डिसेंबर रोजी दुपारी झालेल्या या फसवणूकप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार वैभवी या पुणे येथील खाजगी कंपनीत नोकरी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्या गारखेडा परिसरातील छत्रपतीनगरात आईवडिलांकडे आल्या. ६ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास त्यांनी घरातील जुन्या टेबलचे छायाचित्र ओएलक्सवर टाकून तो विक्रीसाठी असल्याचे नमूद केले. काही वेळाने त्यांना एका अनोळखी महिलेने फोन करून तुमचा टेबल आवडल्याचे सांगितले. यानंतर मदन शर्मा नावाच्या व्यक्तीने फोन करून तुमचा टेबल आवडल्याचे सांगत त्याची किंमत विचारली. त्यांनी अडीच हजार रुपये सांगितल्यावर त्याने आणखी काही विक्री करायचे असेल तर सांगा असे तो म्हणाला . यामुळे वैभवीने स्टॅडचे छायाचित्र त्याला पाठवले. या दोन्ही वस्तूंचे २ हजार ७५० रुपये ठरले. त्याने वैभवीला १० रुपये गुगल पे मार्फत पाठविले. काही वेळाने आरोपीने त्यांच्या मोबाईलवर क्यू.आर. कोड पाठविला. हा कोड स्कॅन करा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील असे सांगितले. यानंतर त्याने वैभवी यांच्या खात्यातून परस्पर गुगल पे आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून २ लाख ९५ हजार ५०३ रुपये काढून घेतले. ही रक्कम परत करण्याची वारंवार विनंती केली, मात्र आरोपीने रक्कम परत केली नाही. शेवटी वैभवीने ११ रोजी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.