छत्रपती संभाजीनगर : 'गोली मार के बता', असे मैत्रीण म्हणताच थेट गोळी झाडणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा (रा. किलेअर्क) याला गुन्हे शाखेने सोमवारी रात्रीतून अटक केली. मंगळवारी त्याला पंचनाम्यासाठी घेऊन जात असताना त्याने हिंदीतून 'बाहेर आल्यावर आणखी चार मुलींना मारेन, त्यात काय एवढे', असे पोलिसांसमोर म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान दिले. यामुळे शहरात गुन्हेगारांची वाढलेली मुजाेरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
११ ऑगस्ट रोजी तेजा २५ वर्षीय मैत्रिणीसोबत त्याच्या किल्लेअर्कच्या घरात होता. यावेळी अमली पदार्थांचा तस्कर, कुख्यात गुन्हेगार तालेब चाऊस, त्याचा मेव्हणा सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे, त्याची आई रेश्मा अंजुम सय्यद घरातच होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास मैत्रिणीने तेजाजवळील चार्जिंगला लावलेला मोबाइल मागितला. तेव्हा त्याने शिवीगाळ करत नकार दिला. त्यावरून वाद होत त्याने गोळी मारण्याची धमकी दिली. मैत्रिणीने त्याला 'गोली मार के बता' असे म्हणताच तेजाने गोळी झाडली. जी तिच्या उजव्या हातात घुसली. तेजाच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले.
थेट घरात प्रवेशगोळीबाराच्या आवाजाने रहिवासी घाबरून गेले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप शिंदे यांनी त्याच्या घरात प्रवेश करत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस पेाहोचल्याची माहिती कळताच तेजाची आई, मेव्हणा, मित्र, मैत्रिणीला सोडून पसार झाले. मंगळवारी त्याला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुन्हेगारांसोबत स्वागताच्या जंगी पार्ट्या४ एप्रिल, २०२५ रोजी तेजाने रिक्षाचालकावर कोयत्याने वार करत दहशत माजवली होती. त्यात अटकेनंतर अकरा दिवसांपूर्वी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला. त्याची आई रेश्मा देखील वीस दिवसांपूर्वी बाहेर आली.कारागृहाबाहेर येताच त्याच्या स्वागताचे सोशल मीडियावर स्टेटस पडले. शहरालगत हॉटेलमध्ये गुन्हेगारांसोबत जंगी पार्ट्या झाल्या. त्याने पिस्तूल मिळवत पुन्हा अमली पदार्थांची तस्करी सुरू केली. तरीही बेगमपुरा पोलिस, गुन्हे शाखेने त्याकडे दुर्लक्ष केले. तेजासह त्याची आई, मेव्हणा, काकाला एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीत अटक केली होती. मात्र, सर्व जण ठराविक अंतराने जामिनावर सुटले.
तेजावर १७ गंभीर गुन्ह्यांची नाेंद, तस्करीचे सिंडीकेट- २०१८ मध्ये पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या तेजावर सात वर्षांत १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.-२०१९ मध्ये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा हत्येचा प्रयत्न, त्यानंतर सिटी चौकात धाकदपटशाही.-२०२० मध्ये बेगमपुऱ्यात मध्ये कोरोना काळात गुन्हेगारी कृत्य.-२०२१ मध्ये सिटी चौक व बेगमपुऱ्यात मारहाण व धमकावणे.-२०२२ मध्ये हर्सूलमध्ये लुटमार, सायबरमध्ये ऑनलाईन विनयभंग, बेगमपुऱ्यात पुन्हा मारहाण, एमआयडीसी वाळूजमध्ये अपहरण, मृत्यूस कारणीभूत.-२०२३ मध्ये बेगमपुऱ्यात शस्त्रसाठा, हत्येच्या प्रयत्नाचे दोन स्वतंत्र गुन्हे.-२०२४ मध्ये सिडकोत बलात्कार, बेगमपुऱ्यात अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे.-२०२५ मध्ये सिडको हत्येसह सोमवारच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा.