जनतेच्या न्यायालयात मला न्यायच मिळाला

By Admin | Updated: July 14, 2016 01:05 IST2016-07-14T00:36:03+5:302016-07-14T01:05:47+5:30

गोविंद इंगळे , निलंगा संघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून

I was justified in the court of public | जनतेच्या न्यायालयात मला न्यायच मिळाला

जनतेच्या न्यायालयात मला न्यायच मिळाला



गोविंद इंगळे , निलंगा
संघर्षातून घडलेला मी कार्यकर्ता असून गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघातील जनतेने माझे पालकत्वाची भूमिका निभावली म्हणून हा माझा सत्कार नसून जनतेचा मला आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम आहे, अशा शब्दात राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्काराला उत्तर दिले.
नीळकंठेश्वर मार्केट येथे सर्वपक्षीय सत्कार समारंभात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई बळीराम पाटील होते. मंचावर खा.डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, प्रेरणाताई पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरूके, मधुताई बिरादार, सं.गा.यो.चे अध्यक्ष अजित पाटील, अशोक बाहेती, अजित माने, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, दगडू सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निलंगेकर म्हणाले, रक्ताच्या नात्यापासून मी १५ वर्षांपासून बाहेर पडलो. माझ्या मतदार संघातील जनतेने मायेचे छत्र देऊन नातेसंबंधांना आकार दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी कॅबिनेट मंत्री झालो, असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्याकडे कामगार खाते आहे. या माध्यमातून कामगारांचा उत्कर्ष कसा होईल, कौशल्य विकासच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून मतदार संघात मोठमोठ्या उद्योगांचे जाळे पसरवू, तसेच ग्रामीण भागात रखडलेली विकासकामे प्राधान्याने कामे केली जातील, असेही ते म्हणाले.
खा. सुनील गायकवाड यांचेही यावेळी भाषण झाले. प्रारंभी संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विविध पक्ष व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यात शिवसेनेचे शेषराव ममाले, राष्ट्रवादीचे सुधीर मसळगे, रिपाइं आठवले गटाचे अंकुश ढेरे, रिपाइं डेमोक्रेटिकचे विकास सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे अजित माने, भटक्या विमुक्त संघटनेचे विकास माने, डॉक्टर असो.चे डॉ. काकासाहेब देशमुख, मनसेचे डॉ. नरसिंग भिकाणे, पत्रकार संघटनेचे राम काळगे, शेतकरी सहकारी साखर कारखाना, उदगीर भाजपा, संभाजी बिग्रेड, शिक्षक संघटना, भालचंद्र ब्लड बँक, माजी सैनिक संघटना, धनगर समाज, शिरुर अनंतपाळ व देवणी परिसरातील विविध संघटना यांचा समावेश होता. सूत्रसंचालन संजय दोरवे यांनी केले तर आभार अजित माने यांनी मानले.
खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. मात्र जनताजनार्दनाला साक्ष ठेवून सांगतो, मी निर्दोष आहे. मी कोणाही शेतकऱ्याला किंबहुना बँकांना बुडविले नाही. माझा वाद पारिवारिक आहे. जर यात मी दोषी आढळलो तर मंत्रिपदाचाच नाही तर राजकीय संन्यास घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही. न्यायालयाचा निर्णय मान्य राहीलच; पण विधानसभेच्या निवडणुकीत मला विजयी करून जनताजनार्दनाच्या न्यायालयात न्यायच मिळाला आहे.
रुपाताई पाटील म्हणाल्या, रामाचा वनवास हा १४ वर्षांचा होता, पण त्यापेक्षा जास्त काळ आमचा वनवास होता. आज तो वनवास संपला आहे. पंढरीची वारी सुरू आहे. मात्र आम्ही जनतेमध्येच विठ्ठल-पांडुरंग पाहतो. माझ्या जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी संभाजीराव व माझी सून प्रेरणावर टाकते, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: I was justified in the court of public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.