मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते साहेब; ते करतात महिन्याला २० पोस्टमॉर्टेम

By संतोष हिरेमठ | Published: January 16, 2024 02:38 PM2024-01-16T14:38:59+5:302024-01-16T14:41:16+5:30

मृत्यूचे कारण उलगडतात, अनेकदा न्यायालयात साक्ष, आरोपीला शिक्षा

I fear living people more than deaths; They do 20 postmortems a month | मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते साहेब; ते करतात महिन्याला २० पोस्टमॉर्टेम

मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते साहेब; ते करतात महिन्याला २० पोस्टमॉर्टेम

छत्रपती संभाजीनगर : एखाद्याच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते. त्यातूनच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्याला शिक्षा होण्यासही मदत होते. हेच काम गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) न्यायवैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. कपिलेश्वर चौधरी करीत आहेत. महिन्याला संवेदनशील अशा प्रकरणातील २० ते ४० मृतदेहांचे ते शवविच्छेदन करतात.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, आत्महत्या केलेल्या आणि खून झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले जातात. शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांना न्यायालयात साक्ष देण्यासाठीही अनेकदा जावे लागते. त्यांच्या साक्षीमुळे आरोपीला शिक्षादेखील होती. अशा परिस्थितीत या डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात डाॅ. चौधरी हे आपले काम करीत आहेत.

पहिले शवविच्छेदन करताना काय वाटले?
डाॅ. चौधरी म्हणाले, २००५ मध्ये जयताने (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा पहिले शवविच्छेदन केले होते. ते आजही आठवते. रस्ते अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले होते. अनेक विचार त्यावेळी आले होते.

मृतदेहाची भीती वाटत नाही का?
डाॅ. चौधरी म्हणाले, पहिले शवविच्छेदन करताना थोडी भीती वाटली होती. परंतु आता कसलीही भीती वाटत नाही.

आतापर्यंत किती शवविच्छेदन केले?
२००५ पासून आतापर्यंत ३ हजारांवर शवविच्छेदन केले आहे. धुळे येथे न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक ते विभागप्रमुख म्हणून २०११ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. २०१९ पासून घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी यांनी सांगितले.

नोकरीची सुरुवात याच कामापासून झाली का?
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरुवात झाली. तेव्हाच पहिले शवविच्छेदन केले होते. त्यानंतर २००८ ते २०११ दरम्यान एमडी फाॅरेन्सिक मेडिसिन पूर्ण केले, असे डाॅ. चौधरी म्हणाले.

तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही का?
डाॅ. चौधरी म्हणाले, शवविच्छेदन करताना आरोग्याची काळजी घ्यावीच लागते. विविध संसर्गासह टीबीचा धोका असतो. त्यामुळे हँडग्लोज, मास्कचा वापर केला जातो. तसेच रिकाम्या पोटी म्हणजे जेवण न करता शवविच्छेदन करणे टाळतो.

काम करताना काही अडचणी आहेत का?
मयताच्या अनेक नातेवाइकांना कायदेशीर बाबींचे ज्ञान नसते. विनाकारण वेगवेगळ्या शंका घेतल्या जातात. गरजेचे नसताना इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली जाते. कायदेशीर बाबी समजावून सांगताना दमछाक होते. अनेकदा साक्ष देण्यासाठी कोर्टात जावे लागते. अशावेळी सुरक्षेचा प्रश्न सतावतो, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी म्हणाले.

समाजात हे काम सांगताना त्रास होतो का?
डाॅ. चौधरी म्हणाले, डाॅक्टर म्हटले की औषधोपचार करणारे असाच समज लोकांचा असतो. त्यामुळे अनेक जण औषधोपचाराचा सल्ला मागतात. तेव्हा न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डाॅक्टर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होतो.

Web Title: I fear living people more than deaths; They do 20 postmortems a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.