पंतप्रधानांसोबत चर्चा करू असे वाटले नव्हते

By Admin | Updated: July 13, 2014 00:21 IST2014-07-13T00:01:28+5:302014-07-13T00:21:22+5:30

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत टीव्हीवर या ना ते कार्यक्रम, जाहिरातीच्या रुपाने नरेंद्र मोदी यांचे दर्शन होत होते़

I did not feel like talking to the Prime Minister | पंतप्रधानांसोबत चर्चा करू असे वाटले नव्हते

पंतप्रधानांसोबत चर्चा करू असे वाटले नव्हते

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत टीव्हीवर या ना ते कार्यक्रम, जाहिरातीच्या रुपाने नरेंद्र मोदी यांचे दर्शन होत होते़ ‘अब की बार, मोदी सरकार’ असे आम्हीही जाहिराती बघून गुणगुणत असत़ परंतु, याच मोदींना प्रत्यक्ष भेटीचा योग येईल, असे वाटले नव्हते़ त्यातच पंतप्रधानांशी मनमोकळेपणे चर्चा करता येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते़ परंतु, हे माझे स्वप्न शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे शक्य झाले़, अशा शब्दांत तन्मय प्रभात शेंडे याने आपले मनोगत व्यक्त केले़
शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांचे ज्ञान चौकस व्हावे यासाठी लोकमत संस्काराचे मोती या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या सहवासात आहे़ निसर्ग सफारी, ग्रीन किड्स यासारखे विषय घेऊन विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरणाविषयी माहिती देण्यात येत आहे़ या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी हवाई सफरचे प्रयोजन होते़ भाग्यवान विद्यार्थ्यांत यावर्षी परभणी येथील वैभवनगरच्या बाल विद्यामंदिरचा सातवीतील विद्यार्थी तन्मय प्रभात शेंडे याची निवड झाली़ मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा हा विमान प्रवास होता़ दिल्ली येथे राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, राष्ट्रपती भवन आदींना भेटी दिल्या़ या हवाई सफरच्या संदर्भात बोलताना तन्मय म्हणाला की, हे सर्व अनुभव आजही मला स्वप्नवत वाटतात़ भव्य असे संसद भवन बघितल्यानंतर अतिथी कक्षात आम्ही सर्वजण बसलो होतो़ या हवाई सफरमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील भाग्यवान विद्यार्थी सहभागी झाले होते़ आम्ही ज्या दिवशी संसद भवनात होतो त्या १० जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात होता़ आम्ही सर्व विद्यार्थी अतिथी कक्षात बसलो असताना अधिवेशनातील मध्यंतराच्या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या कक्षात आले़ आपण कसे आहात, असे मराठीतून त्यांनी सभागृहात प्रवेश करतानाच संवाद साधण्यास प्रारंभ केला़ त्यांच्यासोबत कुठलेही सुरक्षा गार्ड अथवा कर्मचारी नव्हते़ ते आमच्यासोबत बसले़ त्यांनी आम्ही कुठून कुठून आलोत याची चौकशी केली़ पुणे, नागपूर, मुंबईहून कोण कोण आहात, अशी विचारणा केली़ प्रत्येकांशी ओळख करून घेतली़ आपण खूप मोठे व्हा, खूप शिका, देशाची सेवा करा, नावलौकिक मिळवा असा संदेशही त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत दिला़ जवळपास १५ मिनिटे त्यांनी आमच्याशी संवाद साधला़ आमच्यासोबतच्या एका छोट्या मुलास जवळ बोलावून त्याच्याशी गप्पा केल्या़ हे सर्व आम्हाला खूप खूप कौतुकाचे वाटत होते़ पंतप्रधान आमच्यासोबत चर्चा करीत आहेत या अनुभूतीने आम्ही सर्वच जण खूपच भारावून गेलो होतो़ टीव्हीवर दिसणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही प्रत्यक्ष पाहतच नव्हतो तर चर्चा करत होतो़ हे सर्व लोकमतमुळे आम्हाला घडले आहे़, असेही तन्मयने यावेळी सांगितले़ संस्काराचे मोती या लोकमतच्या उपक्रमासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, मी स्पर्धा म्हणून याकडे बघत नाही तर या उपक्रमातून आम्हाला दररोजच थोडे थोडे ज्ञान मिळत असते़ हे ज्ञान आम्हाला आमच्या शैक्षणिक आणि प्रत्यक्ष जीवनातही उपयोगी पडते़ लोकमतच्या प्रत्येक उपक्रमात मी भाग घेतो़ बक्षिसासाठी मी सहभागी होत नाही तर लोकमतमध्ये छापून आलेले मी वाचून आत्मसात करतो़ त्यामुळे माझे सामान्यज्ञान अधिक विकसित झाले आहे, असेही त्याने सांगितले़ (जिल्हा प्रतिनिधी)
तन्मयचे वडील प्रभात शेंडे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता ते म्हणाले की, लोकमतचा हा उपक्रम खरोखरच अभिनंदनीय आहे़ या उपक्रमातून विद्यार्थ्यांसोबतच आम्हालाही ज्ञानार्जन होते़ अशा उपक्रमांचा खरोखरच आपल्या ज्ञानासाठी लाभ घेतला पाहिजे, असेही प्रभात शेंडे यांनी सांगितले़

Web Title: I did not feel like talking to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.