बजाजनगरात हायमास्टचा लखलखाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:51 IST2019-03-14T23:51:26+5:302019-03-14T23:51:35+5:30
एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसविण्याचे काम हाती घेतले असून, तीन चौकांत हायमास्ट बसविले आहेत.

बजाजनगरात हायमास्टचा लखलखाट
वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसविण्याचे काम हाती घेतले असून, तीन चौकांत हायमास्ट बसविले आहेत. त्यामुळे मुख्य चौक हायमास्टच्या प्रकाशाने उजळून निघणार आहेत.
बजाजनगर निवासी क्षेत्रातील रस्ते गुळगुळीत केले आहेत. परंतू बहुतांशी मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंदावस्थेत आहेत. अंधारातून ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने निवासी क्षेत्रातील रस्त्यावर पथदिवे बसविण्याचे काम हाती घेतले असून, मुख्य चौकातील वर्दळ लक्षात घेवून त्या ठिकाणी हायमास्ट बसविले जात आहेत. मोरे चौक, महाराणा प्रताप चौकात हायमास्ट बसविल्यानंतर प्रशासनाने अभियंता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी निवासी क्षेत्रातील त्रिमूर्ती चौक, जयभवानी चौक व शिवराणा चौक या ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बजाजनगरातील मुख्य चौकात हायमास्टच्या प्रकाशाचा लखलखाट राहणार आहे.