जलविद्युत प्रकल्प सुरू
By Admin | Updated: August 10, 2016 00:27 IST2016-08-10T00:12:59+5:302016-08-10T00:27:36+5:30
पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे.

जलविद्युत प्रकल्प सुरू
पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या खाली गोदावरी पात्रात पाणी सोडणे व गोदापात्रातील पाणी परत धरणात ओढणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे गोदाकाठी धार्मिक विधी करणाऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
जायकवाडी प्रकल्पावरील जल विद्युत गेल्या वर्षी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. त्यातच १४ मार्च २०१६ पासून जायकवाडी जोत्याखाली गेल्यामुळे हा प्रकल्प सुरू होऊ शकला नव्हता. जायकवाडीत पुरेसा पाणी साठा होताच, हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून १२ मेगावॅट विजेची निर्मिती होते. ही वीज नॅशनल ग्रीडला पुरविली जाते.
जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्यामुळे यंदा धरणातून सिंचनासाठी ठरल्याप्रमाणे रोटेशन देता येणार आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा येवा घटला असून, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून नाममात्र पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. गोदावरी व प्रवराचे मिळून जायकवाडीत सोमवारी २६,६६६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. ती मंगळवारी १३,००० क्युसेक्स एवढी घटली आहे. जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी ४९.६६% जलसाठा झाल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे येथील धरण समूहातून विसर्ग नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे गोदावरी पात्रात नांदुर मधमेश्वर धरणातून मंगळवारी केवळ १५,८४६ क्युसेक्स विसर्ग होत होता.
नगरच्या पाण्याचा दिलासा
अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून सोडलेले पाणी रविवारी दुपारी गोदावरी नदीला प्रवरा संगम येथे येऊन मिळाले. मुळा धरणातून मंगळवारी ६,००० वरून ७,००० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. ओझर वेअरमधून सोडण्यात आलेला २,८३० क्युसेक्सचा विसर्ग मंगळवारी ५,६६१ करण्यात आला, हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.