हुश्श... एकदाची जाहीर झाली ‘नीट’ची तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST2021-07-14T04:05:52+5:302021-07-14T04:05:52+5:30
औरंगाबाद : एकदाची ‘नीट’ची तारीख जाहीर झाली आणि औरंगाबादेतील असंख्य विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्यावी ...

हुश्श... एकदाची जाहीर झाली ‘नीट’ची तारीख
औरंगाबाद : एकदाची ‘नीट’ची तारीख जाहीर झाली आणि औरंगाबादेतील असंख्य विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्यावी लागणाऱ्या राष्ट्रीय पातत्रा परीक्षेच्या (नीट) तारखेची घोषणा सोमवारी सायंकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘ट्वीटर’वरुन केली.
‘लोकमत’ने शहरातील ‘नीट’ देणाऱ्या तरुणांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यात नैराश्याची भावना जाणवत होती. साधारणपणे दरवर्षी मे महिन्यातच ‘नीट’ घेतली जात होती. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीपासून ही परीक्षा सतत लांबणीवर पडत होती. गेल्या वर्षी ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली होती; परंतु त्या अगोदर बारावीची परीक्षा झालेली होती व ‘नीट’चे पूर्वनियोजनही जाहीर झालेले होते. यंदा राज्य मंडळ आणि ‘सीबीएससी’ने बारावीची परीक्षा रद्द केलेली आहे. दुसरीकडे, यंदा ऑगस्ट महिन्यात ‘नीट’चे आयोजन करण्याची चर्चा झाली. पण, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुच झाली नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या या परीक्षेची तारीख पुन्हा पुढे ढकलली. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये नैराश्याची भावना पसरली होती.
वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्यासाठी साधारणपणे इयत्ता ११ वीपासूनच विद्यार्थी ‘नीट’ची तयारी करत असतात. दीड ते दोन वर्षांपासून परीक्षेची तयारी करुनही तारीख जाहीर होत नसल्यामुळे ‘परीक्षेची तारीख जाहीर झाली असती, तर त्यासंबंधीचे नियोजन करता येते. आम्ही आणखी कुठपर्यंत अभ्यास करावा’, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये उमटल्या होत्या. मात्र, सोमवारी सायंकाळी परीक्षेची तारीख जाहीर झाली आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा नूरच बदलला.
चौकट.....
आता नियोजन करता येईल
११ वीपासूनच आपण ‘नीट’ची तयारी करत होतो. मात्र, परीक्षेची तारीख सतत पुढे ढकलली जात असल्यामुळे नैराश्य आले होते. सायंकाळी परीक्षेची तारीख कळाली आणि फार बरे वाटले. आता नियोजन करता येईल. नाही तर अगोदर कुठपर्यंत आणि किती अभ्यास करावा, या प्रश्नाने व्यथित झालो होतो.
- शेख साहिल, विद्यार्थी
गोंधळलेली मानसिकता झाली होती
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे आपले ध्येय होते. त्या दृष्टिकोनातून मागील दीड- दोन वर्षांपासून ‘नीट’ची तयारी करत होतो. मात्र, परीक्षेबाबत अनिश्चितता वाढल्यामुळे गोंधळलेली मानसिकता झाली होती. सोमवारी सायंकाळी परीक्षेची तारीख समजल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला.
- तुषार माने, विद्यार्थी.