हातोड्याने ठेचून पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:07 IST2017-10-06T01:07:15+5:302017-10-06T01:07:15+5:30
संशयाचे भूत डोक्यात घुसलेल्या एका माथेफिरूने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून केला. नंतर त्याने फरशी कापण्याच्या कटरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला

हातोड्याने ठेचून पत्नीची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संशयाचे भूत डोक्यात घुसलेल्या एका माथेफिरूने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून केला. नंतर त्याने फरशी कापण्याच्या कटरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री मयूरपार्क परिसरातील मारुतीनगरात घडली.
कल्पना हरिओमदास बैनाडे (२७), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे, तर हरिओमदास गोविंददास बैनाडे (३५), असे खुनी पतीचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हरिओमदास बैनाडे हा फरशी बसविण्याचे काम करतो, तर त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी एका खाजगी रुग्णालयात कामाचा शोध घेत होती. या दाम्पत्याला मुलगी नितल (११), ममता (९) आणि मयुरेश (५), अशी अपत्ये आहेत. २००४ साली कल्पना आणि हरिओमदास यांचा विवाह झाला. हरिओम हा संशयी स्वभावाचा होता. तो सतत कल्पना हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याच्या या त्रासाची माहिती माहेरी आणि सासरच्या मंडळींनाही अनेकदा दिली. मात्र, त्याच्याकडून त्रास कमी होत नसल्याने चार महिन्यांपूर्वी कल्पना माहेरी मयूरपार्क येथे मुलगा आणि दोन मुलींसह निघून गेली आणि तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी हरिओमदासला ठाण्यात बोलावून त्यास समज दिली होती.
दहावर्षीय मुलीने
पाहिले भीषण दृश्य
जन्मदात्री मातेच्या डोक्यात हातोडा घालून तिला ठार करण्याचे आणि नंतर कटरने स्वत:चा गळा चिरण्याचे कृत्य नितलने पाहिले. नंतर ती रडू लागली तेव्हा क्रूर हरिओमदासने नितलला गप्प झोपण्यास सांगितले.