लातूर जिल्ह्याचा निर्माता हरपला; भावपूर्ण श्रद्धांजली...

By Admin | Updated: December 3, 2014 01:16 IST2014-12-03T01:06:53+5:302014-12-03T01:16:21+5:30

लातूर : तुमच्या मनात आहे, ते माझ्या ओठात आहे, असा शब्द १६ आॅगस्ट १९८१ च्या दीड महिन्यापूर्वी अभूतपूर्व सत्कार सोहळ्यात लातुरात तत्कालीन मुख्यमंत्री ए़ आऱ अंतुले

Hurpura producer of Latur district; Emotional tribute ... | लातूर जिल्ह्याचा निर्माता हरपला; भावपूर्ण श्रद्धांजली...

लातूर जिल्ह्याचा निर्माता हरपला; भावपूर्ण श्रद्धांजली...


लातूर : तुमच्या मनात आहे, ते माझ्या ओठात आहे, असा शब्द १६ आॅगस्ट १९८१ च्या दीड महिन्यापूर्वी अभूतपूर्व सत्कार सोहळ्यात लातुरात तत्कालीन मुख्यमंत्री ए़ आऱ अंतुले यांनी लातुरकरांना दिला आणि तो सार्थकही ठरविला़ त्यामुळे लातुरचे आणि अंतुले यांचे विलक्षण नाते निर्माण झाले़ पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी लातुरच्या विकासाचे कौतुक करुन नेतृत्वाच्या पाठीवर थाप मारली होती़
लातूर जिल्हा निर्मितीचा जनक म्हणून ए़ आऱ अंतुले लातुरकरांच्या स्मरणात राहणारच आहेत़ १९७० पासून लातुराची जिल्हा निर्मितीची मागणी होत होती़ पुढे पुढे या मागणीने जोर धरला आणि आंदोलनांनीही वेग घेतला़ ८० च्या दशकात मुख्यमंत्री म्हणून अंतुले आले़ त्यावेळी लातुरात जिल्ह्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलने होऊ लागली होती़ सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री अंतुले यांची भेट घेतली़ आंदोलनाला उग्र रुप योऊ नये, यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्काराचे नियोजन केले आणि लातुरात ए़ आऱ अंतुले यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा झाला़ यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, तुमच्या मनात आहे, ते माझ्या ओठात आहे़ अन् येथेच लातूर जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली निघाला़ टाळ्यांचा कडकडाटात आणि अंतुलेंच्या स्वागत घोषणांनी सिद्धेश्वर नगरी दुमदुमली़ त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर १६ आॅगस्ट १९८१ ला लातूर जिल्ह्याची घोषणा त्यांनी केली़ तेव्हापासून अंतुले आणि लातूरचे नाते जिव्हाळ्याचे झाले़ किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी ते केंद्रात होते़ केंद्राकडून पूनर्वसनाच्या कामी लातुरला त्यांनी भरभरुन दिले़ शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख त्यांच्या मंत्रिमंडळात होते़ राज्य आणि देश पातळीवर विलासरावांचे नेतृत्व बहरण्यासाठी अंतुलेंची मदत झाल्याची कृतज्ञता काँग्रेसचे जेष्ठ नेते अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर यांनी व्यक्त केली़ स्वातंत्र सैनिकांना पेन्शन, संजय गांधी निराधार योजनेची मुहुर्तमेढ अंतुले यांनी उभी केली़ गोरगरिब, दिनदुबळ्यांसाठी निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख झाली़ लातूरबरोबर जालना जिल्हा आणि औरंगाबादेत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय त्यांचाच़ काही दिवसांपूर्वीच अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर यांनी मुंबईत रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती़ सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, तुम्ही लवकर बरे व्हा, तुमची पक्षाला गरज आहे, अशी साद घातली होती़ त्यावेळी ते म्हणाले, मी खुप थकलो आहे़ दुरुस्त झालो तर निश्चित काँग्रेस पक्षासाठी आयुष्य देईऩ अशाही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, असे अ‍ॅड. झंवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)४
बॅ.ए.आर. अंतुले लातूर जिल्ह्याचे निर्माते होते. केवळ त्यांनी जिल्ह्याची घोषणा केली नाही, तर जिल्ह्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. या नेत्याची काँग्रेस पक्षाला गरज होती.
-आमदार दिलीपराव देशमुख४
गोरगरिबांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करून अंतुले यांनी सामाजिक न्याय जपला. स्वातंत्र्यसैनिकांनाही पेन्शन मंजूर केले. दिनदुबळ्यांसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. सच्चर समिती स्थापण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता.
- माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे४
१९८१ मध्ये मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांनी लातूर जिल्ह्याची घोषणा केली. तत्पूर्वी आम्ही जिल्हा निर्मितीसाठी आंदोलने केली. परंतु, आमच्या मागणीची खरी दखल मुख्यमंत्री असताना अंतुले यांनीच घेतली. त्यांच्यामुळे जिल्हा झाला.
-अ‍ॅड. मनोहरराव गोमारे
ज्येष्ठ नागरिकांना आधार...
अल्पसंख्यांक समाजातील पहिले मुख्यमंत्री झालेल्या अंतुले यांनी गोरगरिबांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली़ शेतमजूर, विधवा , ज्येष्ठ नागरिकांना आधार द्यावा म्हणून त्यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली़ त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा खरा आधारवड हरवला आहे़ लातूर जिल्हा निर्मिती, संजय गांधी निराधार योजनेचे ते जनक होते़ -मुर्तुजा खान

Web Title: Hurpura producer of Latur district; Emotional tribute ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.