शेकडो जण सुरक्षित स्थळी; एकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 4, 2016 00:40 IST2016-08-04T00:35:35+5:302016-08-04T00:40:44+5:30
औरंगाबाद : वरच्या धरणांमधून गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेकडो जण सुरक्षित स्थळी; एकाचा मृत्यू
औरंगाबाद : वरच्या धरणांमधून गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यात वाहून गेल्यामुळे वैजापूर तालुक्यातील अवलगाव येथील प्रशांत मोहन सवई या २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरीकडे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. सराला बेटासह वंजारवाडा, शिंदेवाडी गावांत अडीचशे लोक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. दरम्यान, मदतकार्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी वैजापुरात दाखल झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीत येणाऱ्या पाण्यात वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा व इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असून, हे पाणी नांदूर- मधमेश्वर येथे येत आहे व तेथून पुढे गोदावरीमधून वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करीत आहे.
काल सायंकाळी नांदूर- मधमेश्वर येथून १ लाख २५ हजार क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग होता. तो सकाळी ६ वा. २ लाख २१ हजार क्युसेक्सपर्यंत वाढला. आज सकाळी ११ वाजेपासून हा विसर्ग १ लाख ९० हजार क्युसेक्स इतका वाढला आहे.
गोदावरी नदीत सोडलेले पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. वैजापूर व गंगापूर या तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील जनतेला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या ठिकाणी असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कारवाई कालपासून सुरू करण्यात आालेली आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
वैजापूर तालुक्यातील पूरणगाव, लाखगंगा, बाबतारा व डोणगाव या गावांच्या सखल भागातील अंदाजे ५० घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदीपात्राच्या बाहेर पुराचे पाणी शेतीत शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले.
जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याकडून पाहणी
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी पूरग्रस्त वांजरगाव आणि सावखेडगंगा येथे दुपारी ३ वाजेदरम्यन भेट देऊन भागाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आरोग्य सेवा देण्यासाठी तालुक्यातील सर्व आरोग्य कें द्राचे कर्मचारी आरोग्यसेवा देत आहेत, तसेच पूरग्रस्तांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गंगापूरही बाधित
गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. नेवरगाव येथील रस्ता बंद आहे आणि तो जास्तीच्या वापराचा नाही.
गोदाकाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर
वैजापूर तालुक्यातील डोणगावच्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे तो बंद झाला आहे. या गावच्या १५०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. बाबतारा गावच्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला आहे. येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे.
या गावच्या १५० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे; पण या गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. भालगावचा रस्ता मात्र पूर्णपणे बंद आहे. चांदेगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे, पण पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. या गावच्या ८ व्यक्तींना हलविण्यात आले आहे. बाजाठाणच्या १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. या गावच्या पुलावरून पाणी वाहत आहे. अवलगाव व डाकपिंपळगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
एनडीआरएफचे पथक दाखल
गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वैजापूर तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा व डोणगाव, वांजरगाव या गावांच्या सखल भागातील ६२ घरांत पाणी शिरले आहे.
वैजापूर तालुक्यातील १२ गावांतील २,८७३ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे येथील एनडीआरएफच्या २५ जवानांची एक तुकडी ३ बोटीसह पुणे येथून वैजापूरकडे रवाना झाली आहे, अशी माहिती तहसीलदार गव्हाड यांनी दिली.
आतापर्यंतचा तालुकानिहाय पाऊस
औरंगाबाद - ४६२ मि. मी.
फुलंब्री - ३५१ मि. मी.
पैठण - ३०० मि. मी.
सिल्लोड - ३५० मि. मी.
सोयगाव - ३१७ मि. मी.
कन्नड - ३६३ मि. मी.
वैजापूर - ३१६ मि. मी.
गंगापूर - २४२ मि. मी.
खुलताबाद- ४२८ मि. मी.
चोवीस तासांमधील दमदार पावसामुळे जिल्ह्यात पावसाने आतापर्यंतची अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्हाभरात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ३१.४० मि. मी. पाऊस झाला.
तीन दिवसांत जायकवाडीत पोहोचणार १८ टीएमसी पाणी
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत धरणात ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला. धरणस्थळी अजूनही ९३ हजार क्युसेक्सने पाणी दाखल होत आहे. आतापर्यंत वरच्या धरणांतून सोडलेले पाणी विचारात घेता येत्या दोन दिवसांत जायकवाडीत एकूण १८ टीएमसी पाणी दाखल होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२३ टक्क्यांपर्यंत भरण्याची शक्यता
बुधवारी सायंकाळपर्यंत जायकवाडीत वरच्या भागातून ११० दलघमी पाणी पोहोचले आहे. आतापर्यंत वरच्या धरणांतून सोडलेले पाणी लक्षात घेता दोन दिवसांत जायकवाडीत एकूण साधारणत: १८ टीएमसी पाणी दाखल होण्याची शक्यता आहे. १८ टीएमसी पाणी आल्यास धरणातील जिवंतसाठा २३ टक्क्यांवर जाईल.
-जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता, कडा