दीड लाख शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ!
By Admin | Updated: August 6, 2014 02:17 IST2014-08-06T01:52:57+5:302014-08-06T02:17:54+5:30
रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली.

दीड लाख शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ!
रामेश्वर काकडे , नांदेड
जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली. आपद्ग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पीककर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात गारपीट व वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिके आडवी पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांसाठी टाकलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते़ त्यात निराश झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला़ शासनाकडून मदतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती़ त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी अनुदान दिले. मात्र सध्या खरीप हंगामही काही भागामध्ये हातचा गेल्यात जमा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. आॅगस्ट उजाडला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत़
आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत देण्यासाठी शासनाने त्यांच्या कर्जाचे तीन वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा तसेच त्यावर आकारले जाणारे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त भागातील पीककर्जदार शेतकऱ्यांना डिसेंबर २०१४ पर्यंत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत ० टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी जून २०१४ पर्यंत किंवा ३६५ दिवसापर्यंंत व्याजाचा फायदा मिळणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार शेतकरी आपद्ग्रस्त असून यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलेले आहे.
सन २०१३-१४ या वर्षात २ लाख ४१ हजार २२१ शेतकऱ्यांना १४४० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. एकूण पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी अंदाजे दीड लाख शेतकरी नुकसानग्रस्त भागातील आहेत. तर दुसरीकडे पंचनाम्याच्या जाचक अटीमुळे अनेक भागातील अल्पभूधारक शेतकरी मात्र लाभापासून वंचित राहिले आहेत.