शेकडो हातपंप बंद अवस्थेत..!
By Admin | Updated: March 28, 2016 00:09 IST2016-03-27T23:56:38+5:302016-03-28T00:09:45+5:30
जालना : शहरातील विविध प्रभाग मिळून पालिकेचे शेकडो हातपंप तसेच विद्युतपंप आहेत. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे असंख्य पंप बंद तर काही गायब आहेत.

शेकडो हातपंप बंद अवस्थेत..!
जालना : शहरातील विविध प्रभाग मिळून पालिकेचे शेकडो हातपंप तसेच विद्युतपंप आहेत. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे असंख्य पंप बंद तर काही गायब आहेत. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभागातील नागरिकांना प्रभागतच पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ठिकठिकाणी बोरींग करण्यात आलेल्या आहेत.
नगर पालिकेने नवीन व जुना जालना मिळून प्रभाग निहाय ९५० पेक्षा जास्त हातपंप, विंधन विहिरी केलेल्या आहेत. प्रत्यक्षात आज रोजी काही बोटावर मोजण्या इतककेच पंप सुरू आहेत. पालिका दरवर्षी हातपंप तसेच विंधन विहिरींसाठी लाखो रूपयांचे नियोजन करते. खर्च होतो. प्रत्यक्षात बोरींग दिसत नसल्याचे वास्तव चित्र आहे. हातपंप दिसत असले तरी ते बंद असतात.
शहरात गत काही वर्षांपासून हजारो बोरींग व विंधन विहिरी करण्यात आल्या. प्रत्यक्षात या बोरींग कोठे गेल्या हा प्रश्नच आहे. पालिकेच्या दाव्यानुसार ९५० बोरींग आहेत. यापैकी ३०० बोरींग उपयोगात येऊ शकत नाहीत. उर्वरित ६५० बोरींगपैकी ३०० पेक्षा अधिक सुरू आहेत तर ३०० बोरींग किरकोळ दुरूस्ती कराव्या लागणार आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे.
यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश ठिकाणच्या घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणच्या बोरींगचे पाणीही फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. काही ठिकाणी मुबलक पाणी असले तरी या बोरींग दुरूस्त नाहीत. पालिकेकडून कधी साहित्य नाही तर कधी मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून दुरूस्तीकडे टाळाटाळ केली जात आहे.
विशेषत: झोपडपट्टी भागातील रहिवाशांना या बोरींग महत्वपूर्ण ठरत असल्या तरी याकडे पालिकेचा कानाडोळा आहे. पालिकेने या बोरींगची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पालिकेकडून ९५० बोरींग अस्तित्वात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढ्या बोरींग असतील की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. १२ प्रभागांचे सर्व्हेक्षण केल्यास प्रत्येक प्रभागात एखाद दोन बोरींग सुरू असतील. उन्हाळ्याचे दिवस तसेच शहरात तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पालिकेने बंद असलेले हातपंप तात्काळ दुरूस्त करावेत, अशी मागणी होत आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही हातपंप सुरू केले जात नाहीत.
ज्या हातपंपांना चांगले पाणी आहे त्या ठिकाणी वीजपंप बसविण्यात यावेत, अशी मागणीही काही वसाहतींमधून जोर धरत आहे. वीजपंप लावल्यास सर्वच नागरिकांना मुबलक पाणी मिळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच नगर पालिकेने नवीन बोरींग करण्याऐवजी आहे त्या बोरींग व्यवस्थित दुरूस्त केल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकेल. बोरींग विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)