शेकडो गावरान चिंचांच्या झाडांमुळे गावकऱ्यांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:27+5:302021-06-11T04:05:27+5:30
सुनील घोडके : खुलताबाद : तालुक्यातील कसाबखेडा हे गाव गावरान चिंचांसाठी प्रसिद्ध असून, गावात शंभर ते सव्वाशे वर्षांची शेकडो ...

शेकडो गावरान चिंचांच्या झाडांमुळे गावकऱ्यांना मिळाला रोजगार
सुनील घोडके :
खुलताबाद : तालुक्यातील कसाबखेडा हे गाव गावरान चिंचांसाठी प्रसिद्ध असून, गावात शंभर ते सव्वाशे वर्षांची शेकडो चिंचांची झाडे आहेत. कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प पडलेले असताना या चिंचांच्या खटाईने गावकऱ्यांच्या जीवनात मिठाईचे काम केले आहे. चिंचांच्या व्यवसायातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला आहे.
खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गावात, शेतातील बांधावर हजारो चिंचेची झाडे पाहावयास मिळतात. अनेक झाडे तर शंभर वर्षांपूर्वीची असून, आजोबा, पणजोबांनी लावलेली ही झाडे नातवंडांना मोठा आर्थिक हातभार लावत आहेत. चिंचेमुळे गावातील तीनशे ते चारशे महिला, पुरुषांना चार महिने रोजगार मिळतो. गावरान चिंचेचे प्रत्येक घटक जसे की, टरफल, चिंचोका, गर, चिंचेचे आवरण हे पैसे मिळवून देतात.
कसाबखेडा येथील प्रगतशील शेतकरी चेतन गौतमचंद ठोले यांच्या शंभर एकर शेतात ४००च्या आसपास चिंचेची झाडे आहेत. त्यांनी व्यापाऱ्यास साडेआठ लाख रुपयांत यावर्षीचे उत्पन्न विक्री केले आहे. गावातील शंकर रामभाऊ जाधव यांच्या शेतातही ८० च्या आसपास झाडे आहेत. पांडुरंग राजाराम वेताळ यांच्या शेतातही १०० चिंचेची झाडे आहेत. याचबरोबर गावाच्या परिसरात जवळपास दीड हजार झाडे असल्याचे दिसून येतात. कसाबखेडा येथील चिंच ही प्रामुख्याने दक्षिण भारतात पाठविली जाते. चेतन ठोले याविषयी म्हणाले की, माझ्या आजोबा, पणजोबांनी त्यांच्या काळात बांधावर लावलेल्या चिंचेच्या झाडांमुळे आम्हाला उत्पन्नाचे साधन निर्माण झाले असून, लाखो रुपयांचा फायदा होत आहे. कसाबखेडा गावातच चिंचेचे व्यापारी असून, बाहेरील व्यापारीही चिंचा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. चिंचेच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च येत नाही. चिंचेच्या विक्रीपासून गावातील शेतकऱ्यांना जवळपास ३५ ते ४० लाखांच्या आसपास उत्पादन मिळते. उपसरपंच तनवीर पटेल म्हणाले की, चिंचांच्या झाडांमुळे गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेतील चिंचेच्या मोठ्या झाडास आग लागली होती. हे झाड वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग विझविली.
कोट
गावात चिंचेच्या व्यापारामुळे गावातील तीनशे ते चारशे लोकांना पाच महिने काम मिळते. त्यात चिंचा फोडण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. शेतीच्या बांधावर, नाल्यावर चिंचेची झाडे बघायला मिळतात. गावातील चिंचेच्या झाडांमुळे अनेकजण समृद्ध झाले आहेत. वारे, वादळामुळे तसेच रस्ते व बांधकामांमुळे अनेक झाडे तुटली व पडली आहेत.
-किरण मुरलीधर जाधव, शेतकरी
फोटो कॅप्शन : कसाबखेडा गावातील बांधावर असलेली गावरान चिंचेची झाडे.
100621\10_2_abd_35_10062021_1.jpg
कसाबखेडा येथील चिंचेची झाडे.