शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान
By Admin | Updated: September 3, 2014 00:03 IST2014-09-02T23:51:20+5:302014-09-03T00:03:59+5:30
मानवत , दोन - तीन दिवसांपासून मानवत तालुक्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेकडो एकरवरील जमीन खरडून गेली.

शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान
मानवत , दोन - तीन दिवसांपासून मानवत तालुक्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेकडो एकरवरील जमीन खरडून गेली. परिणामी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.
तालुक्यातील कोल्हा, सोमठाणा, आटोळा या गावांना लागून मोठमोठे ओढे आहेत. ज्या ज्यावेळी जोरदार पाऊस होतो, त्या त्यावेळी या ओढ्यांना पूर येतो. त्यामुळे या ओढ्यालगतच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते. २००५ साली झालेल्या अतिवृष्टीतही या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. यावेळी वरील तीनही गावांतील शेतकऱ्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना निवेदन देऊन ओढा सरळीकरण व खोलीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने या ओढ्याचे सरळीकरण व खोलीकरण केले नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनांकडेही प्रशासनाने कानाडोळा केला. त्यामुळे यावर्षीही दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि हे पाणी शेतामध्ये शिरले. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेती खरडून गेल्याने जमीन नापीक झाली आहे. एकीकडे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा तर दुसरीकडे निसर्गावर आधारित शेती उत्पन्न आणि मध्येच अतिवृष्टीचा फटका यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.