आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी
By Admin | Updated: June 20, 2014 01:11 IST2014-06-20T01:04:27+5:302014-06-20T01:11:34+5:30
औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.

आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी
औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादेतील सुमारे १०० विद्यार्थी यशस्वी झाले असून, देशभरातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या सुमारे १८ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. या वर्षी ती गेल्या मे महिन्यात झाली.
नाथ व्हॅली स्कूलचा अमेय राजगोपाल लोया याने आॅल इंडियातून १७० वा रँक मिळवला आहे. त्याला बारावीत ९३ टक्के गुण होते. या यशाबद्दल अमेयने सदर प्रतिनिधीला सांगितले की, जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेलो होतो. रोज ४ ते ५ तास कोचिंग आणि नंतर ९ ते १० तास सेल्फ स्टडी. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग आणि हार्डवर्क करणे आवश्यक आहे. तसेच अभ्यास करताना सर्व टॉपिकला समान महत्त्व द्यावे. नियमित सराव करावा, असेही तो म्हणाला.
छत्रपती कॉलेजचा अक्षय मनोज दुसाद याने जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर ११३४ वा क्रमांक पटकावला. याच महाविद्यालयाचा अर्पित शिवशंकर स्वामी याने ओबीसी प्रवर्गातून मेरिट लिस्टमध्ये ६०६ वा रँक पटकावला. देवगिरी महाविद्यालयाची नेहा मनोज मुथियान हिने आॅल इंडियातून ३०१० वा क्रमांक मिळविला. तिने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी पुष्करराज महेंद्र ढाके याने ओबीसी प्रवर्गातून ४९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना २० ते २४ जूनदरम्यान आॅनलाईन पसंती फॉर्म भरून आयआयटी संस्थांमधील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.