आषाढीसाठी शंभर जादा बसेस
By Admin | Updated: July 4, 2014 00:17 IST2014-07-03T23:35:56+5:302014-07-04T00:17:29+5:30
उस्मानाबाद : श्री क्षेत्र पंढरपूर येथे ९ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

आषाढीसाठी शंभर जादा बसेस
उस्मानाबाद : श्री क्षेत्र पंढरपूर येथे ९ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या यात्रा कालावधीत महामंडळाच्या जिल्ह्यातील विविध आगारातून तब्बल १२० जादा बसगाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार असून, या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी पंढरपूर येथे दोन यात्रा केंद्रेही उभारण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. याच धर्तीवर गतवर्षीही एसटी महामंडळाकडून १२० जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्यांनी यात्रा कालावधीत १८५ फेऱ्या करून २ लाख १५ हजार किमी प्रवास व महामंडळाला ६० लाख ९८ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले होते. यंदाही तेवढ्याच जागा बसगाड्यांची सोय महामंडळाकडून करण्यात आली आहे. यातील ८० बसगाड्या या ४ फेब्रुवारीपासून सोडण्यात येणार आहेत. एकादशीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच ८ जुलै रोजी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याने ८ व ९ जुलै रोजी १०० तर आषाढी पौर्णिमेनिमित्त ११ व १२ जुलै रोजी १२० बसगाड्या पंढरपूरकडे भाविकांची ने-आण करणार आहेत.
यात्रा कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकाशिवाय देगाव फाट्यावर तुळजापूर आणि उस्मानाबाद अशा दोन यात्रा केंद्रांचीही निर्मिती महामंडळाच्या वतीने करण्यात आली असून, या केंद्रावर चार कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय बसगाड्यांची तपासणी करण्यासाठी तीन ठिकाणी विशेष तपासणी केंद्रेही निर्माण करण्यात येणार आहेत. या केंद्रावरील पथके बसगाड्यांची तपासणी करून विनातिकीट प्रवास रोखणे व इतर बाबी पार पाडणार आहेत. पंढरपूरकडे जाताना वा दर्शन घेऊन परत येताना भाविकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी महामंडळाकडून या मार्गावर अॅम्ब्युलन्स, टँकर, बसगाडीत बिघाड झाल्यास मेकॅनिक आदी सोयीही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
आगारनिहाय जादा बसगाड्या अशा
उस्मानाबाद२७
उमरगा१७
भूम२१
तुळजापूर२७
कळंब२०
परंडा०८
एकूण१२०