‘शुभकल्याण’मध्ये अडकले दीड कोटी
By Admin | Updated: April 8, 2017 00:05 IST2017-04-08T00:01:44+5:302017-04-08T00:05:16+5:30
आष्टी : शुभकल्याण मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेत दोनशेवर खातेदारांचे सुमारे दीड कोटी रूपये अडकले आहेत.

‘शुभकल्याण’मध्ये अडकले दीड कोटी
आष्टी : शुभकल्याण मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेत दोनशेवर खातेदारांचे सुमारे दीड कोटी रूपये अडकले आहेत. वारंवार चकरा मारूनदेखील मुदतठेवींचे पैसे मिळत नसल्याने खातेदारांमधून संताप व्यक्त होत आहे. गतआठवड्यातच ठेवी मिळत नसल्याने बीड येथील शाखेला संतप्त खातेदारांनी टाळे ठोकले होते. ग्राहकांच्या संतापाचे लोण आता जिल्हाभर पसरू लागले आहे.
शहरातील लेंडीपुलावर शुभकल्याण मल्टीस्टेट पतसंस्थेने दोन वर्षांपूर्वी शाखा थाटली. ५७ महिन्यांत दामदुप्पट, १६ ते १७ टक्के व्याजदर, एक लाखास १३०० रूपयांचे व्याज अशी आमिषे दाखवत पतसंस्थेने सुमारे दीड कोटी रु पयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. तसेच पिग्मी एजंटाच्या माध्यमातून व्यवसायदारांकडील मोठी रक्कम जमा केल्याचे समजते.
मात्र, ठेवीची मुदत संपल्यानंतर पैशांची मागणी करताच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पतसंस्थेची मुख्य शाखा उस्मानाबाद येथे असून काही खातेदारांनी तेथे जाऊनही आमचे पैसे द्या असे म्हणत तेथे ठिय्या मांडला. मात्र, १५ एप्रिलपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असे सांगून खातेदारांची बोळवण करण्यात आली.
खातेदारांनी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार केली असता मल्टीस्टेट बँकांवर आमचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे खातेदारांना सांगण्यात आले. त्यामुळे आता सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना पतसंस्थेवर कारवाई करून ठेवींची रक्कम द्यावी, अशी मागणी खातेदारांनी केली. (वार्ताहर)