यशाचा स्वीकार नम्रतेने करायला हवा
By Admin | Updated: July 19, 2014 01:21 IST2014-07-19T00:57:41+5:302014-07-19T01:21:58+5:30
औरंगाबाद : आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तीने हे यश आपले एकट्याचे आहे या भ्रमात कधीही राहू नये. प्रत्येक व्यक्तीच्या यशामध्ये अनेकांचा सहभाग असतोच.
यशाचा स्वीकार नम्रतेने करायला हवा
औरंगाबाद : आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तीने हे यश आपले एकट्याचे आहे या भ्रमात कधीही राहू नये. प्रत्येक व्यक्तीच्या यशामध्ये अनेकांचा सहभाग असतोच. यश कधीही एकट्याचे असूच शकत नाही. त्यामुळे यशाचा स्वीकार हा नम्रतेने करायला हवा. आपल्याला सहकार्य करणाऱ्यांची कधीही उपेक्षा करू नका, त्यांच्या उपकारांची जाणीव मनात सतत असेल तरच तुमच्या यशाला नम्रतेची सोनेरी किनार लाभेल आणि हे यश अधिक झळाळून उठेल.
यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.
सृजनाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच सृजनशीलता असू शकते.
आपल्या हातून किती सृजनात्मक कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.
या सर्वांपेक्षा उच्च प्रतीची भावना असते ती माता- पित्यांच्या उपकारांची जाणीव असणे. आज याचीच सर्वत्र उणीव दिसते. आपल्याला जन्म देताना आपल्या निकट असलेल्या आई- वडिलांच्या अंतिम समयी आम्ही त्यांच्याजवळ का नसतो, याचा गंभीरपणे विचार करा. आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचा उपकार स्वीकारत असतो. किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवा.