आर्द्रातही ३८ अंश तापमान
By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:18:19+5:302014-06-26T00:40:07+5:30
नांदेड : रोहिणी, मृग व आता आर्द्रातही उन्हाचे चटके बसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे़ उन्हाची काहिली कायम असल्याने तापमानात निच्चांक होत नसल्याचे चित्र आहे़

आर्द्रातही ३८ अंश तापमान
नांदेड : रोहिणी, मृग व आता आर्द्रातही उन्हाचे चटके बसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे़ उन्हाची काहिली कायम असल्याने तापमानात निच्चांक होत नसल्याचे चित्र आहे़ बुधवारी ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या गेले़
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आर्द्रातही पाऊस पडण्याचे संकेत दिसत नसल्याने निराशा आली आहे़ २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून हे नक्षत्र ५ जुलैपर्यंत राहणार आहे़ मृग नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांना आर्द्राचा आधार वाटत होता़ मात्र उन्हाळी वातावरणामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ मागील पाच, सहा दिवसांत ३८ अंश सेल्सिअसवर तापमान नोंदल्या गेले आहे़ दुपारच्या वेळी उन्हामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे़ उकाड्यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत़ तर रात्रीच्या वेळी सुसाट वारे वाहत आहेत़ आकाश निरभ्र दिसत असल्याने पाऊस पडण्याचे अंदाज फोल ठरले आहेत़ हवामान विभागाने यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचे अंदाज वर्तविले होते़ मात्र सर्व तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत़
शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी मे महिन्यातच नियोजन केले होते़ घरातील वस्तु गहाण ठेवून प्रसंगी विकून शेतकऱ्यांनी बी- बियाणांची सोय केली होती़ मृगाच्या पावसावर पेरणी करण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही़ त्यातच आर्द्रातही उन्हाळाच पदरी आल्याने शेतकरी चिंतेत आहेत़
गतवर्षी शेतकऱ्यांनी मृगाच्या पावसावर पेरण्या केल्यामुळे आर्द्रात पिकांची वाढ चांगली झाली होती़ मात्र मशागत करून ठेवलेल्या शेतात अद्याप पेरणी न झाल्यामुळे हिरवाई दिसत नाही़ (प्रतिनिधी)