प्लास्टिक सर्जरी शिबिरात मानवतेचे दर्शन
By Admin | Updated: December 16, 2015 00:14 IST2015-12-16T00:10:10+5:302015-12-16T00:14:23+5:30
औरंगाबाद : शस्त्रक्रियेने आपल्या मुला-मुलींना नवसौंदर्य प्राप्त होणार म्हणून त्यांचे नातेवाईक आशेने येथे तासन्तास बसून होते...

प्लास्टिक सर्जरी शिबिरात मानवतेचे दर्शन
औरंगाबाद : प्रसंग-लायन्स मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा. स्थळ- एमजीएम हॉस्पिटल... मंगळवारी सकाळी दूरदूरचे रुग्ण येत होते... कोणाच्या बाळाचे ओठ दुभंगलेले तर कोणाच्या चेहऱ्यावर डाग पडलेला... शस्त्रक्रियेने आपल्या मुला-मुलींना नवसौंदर्य प्राप्त होणार म्हणून त्यांचे नातेवाईक आशेने येथे तासन्तास बसून होते... त्या रुग्ण व नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी व त्यांची नावनोंदणी करण्यापासून ते डिस्चार्ज देण्यापर्यंतचे सर्व कार्य नि:स्वार्थपणे होत आहे. यासाठी शेकडो हात रात्रंदिवस झटत असून, खऱ्या अर्थाने ‘मानवते’चे दर्शन येथे घडत आहे.
‘मानवता हीच खरी ईश्वर सेवा’ मानणारे सेवाव्रती या प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. मग ते अमेरिकेतून आलेले प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ असोत, की एमजीएममधील डॉक्टर, नर्सचे पथक असो की, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, हे सर्व जण रुग्णाच्या सेवेसाठी तन-मन लावून काम करताना दिसून येत आहेत. आपली प्रतिष्ठेची पाटी बाजूला सारून प्रत्येक जण येथे मिळेल ते काम करताना दिसून येत आहे. लायन्सचे पदाधिकारी रुग्णांची नोंद करून संबंधितांना दुसऱ्या मजल्यावरील आॅपरेशन थिएटरकडे पाठवितात. एमजीएम हॉस्पिटल प्रशासनाने सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेले ४ आॅपरेशन थिएटर खास या शिबिरासाठी दिले आहेत. याशिवाय एक ४० खाटांचा वॉर्डही उपलब्ध करून दिला आहे. अमेरिकेतील प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. राज लाला व डॉ. विजय मोराडिया यांच्या सोबत एमजीएमचे डॉक्टर तसेच भूलतज्ज्ञ काम करीत आहेत. याशिवाय नर्स व कर्मचारी असे एकूण ४० ते ४५ जणांचे पथक रुग्णांची काळजी घेत आहे. यात मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा कक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल वर्मा, डॉ. शुभम मालपाणी, डॉ. सज्जन संघाई, डॉ. अक्षय गोयल, डॉ. प्रीती देसाई, डॉ. ठाकरे, भूलतज्ज्ञ डॉ. एस.जी. कुलकर्णी, डॉ. पी.व्ही. भाले, डॉ. व्ही.पी. केळकर, डॉ. रश्मी जोशी, डॉ. शिल्पा लोहिया, डॉ. सुजाता सोमाणी, डाौ. गीता फरवाणी उपचार करीत आहेत. एमजीएमचे एस.टी. काझी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.