मानवी कवटी आढळली
By Admin | Updated: May 19, 2015 00:48 IST2015-05-19T00:16:52+5:302015-05-19T00:48:05+5:30
गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी-एकोंडी शिवारातील चिंचोली-पळसगाव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्राच्या भागातील बेशरमाच्या झुडपातमानवी कवटी आढळली

मानवी कवटी आढळली
गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी-एकोंडी शिवारातील चिंचोली-पळसगाव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्राच्या भागातील बेशरमाच्या झुडपात रविवारी (आळवण) एक मानवी कवटी तसेच लांब केस आणि महिलेच्या केसांना लावावयाचे रबर (बो) आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील एकोंडी शिवारात उमरग्याचे नगरसेवक आतिक मुन्शी यांच्या शेताशेजारी चिंचोली-पळसगाव साठवण तलावाचे बुडीत क्षेत्र आहे. येथीलच बेशरमाच्या आळवणीत काही जणांना एक मानवी कवटी, त्याशेजारी लांब केस व केसांना बांधायचे रबर (बो) आदी साहित्य दिसून आले. त्यांनी ही माहिती तातडीने आजुबाजुच्या शेतकऱ्यांना दिली. पाहता-पाहता ही वार्ता गुंजोटीसह परिसरातील गावात पसरली आणि सर्वत्र याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, गुंजोटीचे सरपंच पोलिस पाटील नाजेर देशमुख यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून याबाबत कळविले.
ही माहिती मिळताच उमरग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी एल. कलासागर, पोलिस निरीक्षक शिवाजी जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले, लोंढे आदींचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी तलावाचा परिसर पिंजून काढला. या ठिकाणी पोलिसांना मानवी जातीच्या कवटीसह केस, एक पन्ना तुटलेली चप्पल, विषारी द्रव असलेली अर्धी बाटली, एक देशी दारूची रिकामी बाटली आदी वस्तू मिळून आल्या. यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पोलिस श्वानासह घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, अद्याप घटनेचा तपास सुरू असल्याने अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. (वार्ताहर)
घटनास्थळी पोलिसांना लांब केस तसेच केसांना लावावयाचे रबर आढळून आले आहे. त्यामुळे ही मानवी कवटी एखाद्या महिलेची असण्याची शंका व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने या भागातून ‘मिसींग’ नोंद झालेल्या महिलांवरून या प्रकरणाचा तपास पोलिस करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच याप्रकरणी काही संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान, याबाबत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.