छत्रपती संभाजीनगर : हम नगरसेवक अझहर पठाण के लोग हैं, तुम बहोत मस्ती में आए है, तुमको देखना पडेगा, सीपी को मिलकर तेरी वर्दी उतार दूँगा, तुझे चाकू से काट डालूँगा...’ असे म्हणत दोन टवाळखोरांनी चक्क वाहतूक पोलिसांवर भर रस्त्यावर धमकावत धक्काबुक्की केली. १८ मार्चला दुपारी ३ वाजता हर्सूल टी पॉइंटवर ही घटना घडली. महिन्याभरात शहरात पोलिसांवर हल्ला करण्याची ही पाचवी घटना आहे.
हर्सूल ठाण्याचे अंमलदार मोहन सिंगल हे १८ मार्चला गुन्हेगाराचा शोधासाठी तपास करत होते. दुपारी तीनच्या सुमारास हर्सूल ठाण्याच्या दिशेने जाताना हर्सूल टी पॉइंटवर एका क्रूझर चालकाने (एमएच-२० ईई-५३३२) रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी गाडी उभी केली होती. सिंगल यांनी त्याला विचारणा करून गाडी बाजूला करण्यास सांगितले. त्यातून चालक व त्याच्या सहकाऱ्याने त्यांना शिवीगाळ केली. उद्धटपणे बोलत नगरसेवकाच्या नावाने धमकावले. पोलिस आयुक्तांकडून गणवेश काढण्याची धमकी देत चाकूने कापण्याच्या धमक्या दिल्या. त्यांच्या धिंगाण्यामुळे रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला. दोन्ही टवाळखोरांनी त्यांचे वाहन तेथेच उभे करून पसार झाले. या प्रकरणी दोघांवर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार पोपळ दहिफळे अधिक तपास करत आहेत.
न्यायालयाचे बेलिफ, वकिलावर हल्लाएकीकडे पोलिसांसोबत धक्काबुक्कीची घटना ताजी असतानाच जटवाड्यातील चिमनपूरवाडीत वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ बेलिफ व वकिलाला कुटुंबातील चौघांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. दिवाणी न्यायालयाचे बेलिफ मोतीराम मुंढे (५५) हे ॲड. बळवंत कोकणे यांच्यासह सदर ठिकाणी आप्पासाहेब भाऊराव खंडागळे (५८) यांना त्यांच्या थकीत ३ लाख ४३ हजारांच्या कर्जप्रकरणात वॉरंट बजावण्यासाठी गेले होते. तेव्हा खंडागळे तसेच त्याचा भाऊ व दोन्ही मुलांनी त्यांना अचानक मारहाण केली. ॲड. कोकणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच त्यांनाही मारहाण करून परत आल्यास हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेबाबत न्यायालयात अहवाल सादर करून मुंढे यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आप्पासाहेब खंडागळे तसेच त्याचा भाऊ व दोन्ही मुलांवर १८ मार्चला गुन्हा दाखल झाला.
महिन्याभरात पाचवी घटना- २२ फेब्रुवारीला सुदर्शननगरमध्ये वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सिडको ठाण्याचे विनोद खरात व त्यांच्या सहकाऱ्यांवर शुभम रणयेवले, राजेंद्र रणयेवले, माया रणयेवले यांनी गणवेश फाडून मारहाण करत गळा दाबण्यापर्यंत मजल मारली.- २२ फेब्रुवारीला सोमनाथ मुरलीधर गिरी या मद्यपीने हायकोर्ट सिग्नलवर कार्यरत वाहतूक पोलिसावर हात उचलून हल्ला केला होता.- २६ फेब्रुवारीला भावसिंगपुऱ्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार ईश्वर चव्हाण, सचिन त्रिभुवन यांनी मिळून छावणी पोलिसांवर हल्ला चढवून त्यांचा गणवेश फाडला.- ७ मार्चला जळगाव रस्त्यावरील पिरॅमिड चौकात एका खासगी कंपनीच्या मद्यधुंद वाहनचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.- १८ मार्चला दुपारी तीन वाजता हर्सूल टी पॉइंटवर दोन टवाळखोरांनी वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केली.