हडकोत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 28, 2014 00:01 IST2014-08-27T23:51:22+5:302014-08-28T00:01:21+5:30
काल रात्री एकापाठोपाठ तीन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातून कारटेप व एसीचा कीट, असा सुमारे सव्वालाखाचा ऐवज लंपास केला.

हडकोत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ
औरंगाबाद : हडकोत एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा काल रात्री एकापाठोपाठ तीन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातून कारटेप व एसीचा कीट, असा सुमारे सव्वालाखाचा ऐवज लंपास केला.
या घटनांबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी हडकोतील गजानननगरातील चुडीवाल व त्यांच्या आसपासची आणखी दोन घरे फोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला होता. एकाच रात्री झालेल्या या तीन घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच काल रात्री चोरट्यांनी याच परिसरात धुमाकूळ घातला. एन-११, श्रीकृष्णनगरातील रहिवासी स्वप्नील राजकुमार वायकोस यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची चोरट्यांनी कार फोडली आणि तिच्यातील कारटेप व एसीचे किट चोरून नेले. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या अन्य दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातील हेच साहित्य चोरून नेले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या चोरीप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिडको- हडको परिसरात सुरू झालेल्या चोरीच्या या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटीत पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन
औरंगाबाद : राज्य शासनाच्या नेत्रदान कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नेत्रदानाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
नेत्रशल्यशास्त्र विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. बी.एस. खैरे, डॉ. वैशाली उणे-लोखंडे, डॉ. अर्चना वरे, डॉ. ज्ञानोबा दराडे, डॉ. सूरजकुमार कुरील, डॉ. संगीता पाटील, डॉ. काशीनाथ चौधरी, डॉ. रंगू वेणुगोपाल, डॉ. अमरनाथ आवरगावकर, डॉ. पी.एल. गट्टाणी, डॉ. युसूफ मणियार, राजेश पोटपल्लेवार आदींची उपस्थिती होती.