हडकोत आठ लाखांची धाडसी घरफोडी
By Admin | Updated: November 25, 2014 01:01 IST2014-11-25T00:53:43+5:302014-11-25T01:01:17+5:30
औरंगाबाद : हडको एन- ११ परिसरातील पाथ्रीकरनगरात रविवारी सायंकाळी एक घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने

हडकोत आठ लाखांची धाडसी घरफोडी
औरंगाबाद : हडको एन- ११ परिसरातील पाथ्रीकरनगरात रविवारी सायंकाळी एक घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा आठ लाखांचा ऐवज चोरून नेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास सांडू पाथ्रीकर हे आपल्या कुटुंबासमवेत पाथ्रीकरनगरात राहतात.
रविवारी सायंकाळी त्यांची मुलगी हडकोत मामाच्या घरी गेली, तर पत्नी नातेवाईकांकडे गेली. त्यानंतर पाथ्रीकर हेसुद्धा हडको कॉर्नर येथे कटिंग करण्यासाठी गेले. जाताना त्यांनी केवळ घराच्या मुख्य दरवाजालाच कुलूप लावले. स्वयंपाक खोलीचा मागील दरवाजा बंद करायला ते विसरले.
हे कुटुंब घरातून बाहेर पडताच मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटे घरात घुसले. त्यांनी कपाटात असलेले साडेपाच लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने उचलले आणि धूम ठोकली. या चोरीप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.