फुलंब्री : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील येथील आदर्श विद्यालयात सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता तेथे कॉप्यांचा सुळसुळाट आढळून आला. पुस्तके, गाईड, नोट्स, चिठ्ठ्या असे ढीगभर साहित्य पथकाने जप्त केले. जिल्हा परिषद सीईओ यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहे. तसेच उर्वरित पेपरसाठी या शाळेतील केंद्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार असल्याचे मीना यानी सांगितले.
आदर्श विद्यालयात शनिवारी बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. या केंद्रावर दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी केंद्रातून अनेक लोक बाहेर पडत होते. तसेच पोलिस देखील केंद्राबाहेर रिकामेच उभे होते. तर परीक्षा केंद्राच्या दोन्ही बाजूंनी कॉपी बाहेर फेकलेल्या आढळून आल्या. प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये मीना यांच्या पथकाने पाहणी केली असता विद्यार्थ्यांकडे, खिडकीवर पुस्तके आणि चिठ्ठ्या आढळून आल्या. तपासणी केली असता त्या गणित विषयाशी संबंधित होत्या.
सीईओ मीना यांचे कडक कारवाईचे आदेशजिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व यंत्रणांना आदेशित करण्यात आलेले आहे. तरीही पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयामध्ये कॉप्यांचा सुळसुळाट आढळून आला. या प्रकारामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी संताप व्यक्त केला. संस्था, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकसह बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी व इतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कडक कारवाईच्या आदेशामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.