बॉलीवूडमधील हृतिकचा पुतळा नागेश्वरवाडीत
By Admin | Updated: August 31, 2014 00:42 IST2014-08-31T00:28:21+5:302014-08-31T00:42:45+5:30
औरंगाबाद : बॉलीवूडच्या बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणारा ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुपरहीरो हृतिक रोशनचा पुतळा शहरातील नागेश्वरवाडीत सर्वांना पाहावयास मिळत आहे.

बॉलीवूडमधील हृतिकचा पुतळा नागेश्वरवाडीत
औरंगाबाद : बॉलीवूडच्या बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणारा ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुपरहीरो हृतिक रोशनचा पुतळा शहरातील नागेश्वरवाडीत सर्वांना पाहावयास मिळत आहे. हे वाचून आश्चर्य वाटले असेल; पण येथील नागेश्वर गणेश मंडळाने थेट बॉलीवूडमधील हा पुतळा शहरात आणून सर्वांना चकित केले आहे.
‘क्रिश-३’ चित्रपटात सुपरहीरोची भूमिका साकारणाऱ्या हृतिक रोशनचा २७ फुटांचा पुतळा तयार करण्यात आला होता. ‘गॉड अल्लाह और भगवान सबने बनाया इक इन्सान’ या गाण्यात हा पुतळा सर्वांनी पाहिला आहे.
रुपेरी पडद्यावर पाहिलेला हा भव्य पुतळा हृतिकच्या चाहत्यांना प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे. नागेश्वर गणेश मंडळाने नागेश्वरवाडीच्या चौकात हा पुतळा उभारला आहे. यासंदर्भात मंडळाचे पदाधिकारी मनीष देशपांडे यांनी सांगितले की, आमच्याच मंडळातील बालपणीचा मित्र आता बॉलीवूडमध्ये आर्ट डायरेक्टर असलेला सुनील जैस्वाल याने ‘क्रिश-३’साठी हा पुतळा तयार केला होता. तोच पुतळा येथे आणण्यात आला आहे. २७ फुटांचा हा पुतळा संपूर्ण फायबरने बनवलेला आहे. मागील २७ वर्षांपासून मंडळ कार्यरत असून, दोन वर्षांपूर्वी ‘अग्निपथ’ चित्रपटासाठी वापरण्यात आलेली अष्टभुजा असलेली गणपतीची भव्यमूर्ती गणेशोत्सवात आणण्यात आली होती. तसेच मागील वर्षी गणेशोत्सवात हिंदी चित्रपटात दाखविण्यात येणारी मंदिराची प्रतिकृतीही येथे उभारण्यात आली होती.
हृतिक रोशनचा हा भव्य पुतळा त्याच्या चाहत्यांसाठी गणेशोत्सवाची आगळीवेगळी भेटच ठरत आहे. तरुण असो वा तरुणी सर्व जण या पुतळ्याची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत आहेत. बच्चेकंपनीही हा भव्य पुतळा पाहून खुश होत आहे.