विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST2021-07-14T04:02:01+5:302021-07-14T04:02:01+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या रेल्वेगाड्या पुन्हा धावण्यास सुरुवात झाली आहे. पण सर्व रेल्वे आजघडीला ...

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार?
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या रेल्वेगाड्या पुन्हा धावण्यास सुरुवात झाली आहे. पण सर्व रेल्वे आजघडीला विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. जनरल तिकीट बंद आहे. आरक्षण तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. जनरल तिकिटाअभावी आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर ओढावत आहे. त्यामुळे विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार, असा सवाल प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांतून उपस्थित केला जात आहे.
औरंगाबादहून आजघडीला दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २२ रेल्वेंची ये-जा होते. या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणूनच धावत आहेत. या रेल्वे आरक्षित आहेत. म्हणजे आरक्षित तिकीट नसेल तर प्रवाशांना प्रवास करता येत नाही. जनरल तिकीट देणेच बंद आहे. त्यामुळे आरक्षण तिकीट काढायचे म्हणजे अधिक रक्कम मोजायची, अशी अवस्था झाली आहे. त्यातही ज्येष्ठ प्रवाशांना तिकिटात देण्यात येणारी सवलतही या विशेष रेल्वेत बंद आहे. रेल्वेने प्रवास करताना आजघडीला प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. पॅसेंजर रेल्वेही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी रेल्वेने प्रवास करायचा नाही का, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
------
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
- सचखंड एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- अजंता एक्स्प्रेस
- रेणीगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
---
प्रवासी संघटना, व्यावसायिक म्हणतात...
सर्वसामान्य प्रवाशांची परवड
जनरल तिकीट बंद आहेत. दिव्यांग, ज्येष्ठांना देण्यात येणारी सवलत बंद आहे. विशेष रेल्वेच्या नावाखाली रेल्वे धावत आहे. त्यासाठी अधिक तिकीट दर मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची परवड होत आहे. विशेष रेल्वेचा दर्जा काढून सर्व रेल्वे नियमित केल्या पाहिजे.
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना
---
अधिक तिकीट दर
विशेष रेल्वे चालविण्यात येत असल्याने प्रवाशांना अधिक तिकीट दर मोजावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजे. केवळ आरक्षण तिकीट दिले जात असल्याने प्रवाशांचा काही प्रमाणात फायदा होत आहे. कारण आरक्षित तिकीट नसलेल्या प्रवाशांचा त्रास होत नाही.
- अझहर सय्यद, अधिकृत रेल्वे जनरल तिकीट विक्रेता
--------
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
सध्या धावणाऱ्या विशेष रेल्वेत आरक्षण तिकीट असेल तरच प्रवास करता येत आहे. जनरल तिकीट विक्री बंद आहे. त्यामुळे ऐनवेळी एखाद्या प्रवाशाला प्रवास करायचा असेल तर अशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत असल्याने लवकरात लवकर जनरल तिकीट देण्यास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
---
तिकीट दरात असा पडतोय फरक
तपोवन एक्स्प्रेसने पूर्वी नांदेडला ९० रुपयांत जाता येत होते. परंतु आता याच रेल्वेने नांदेडला जाण्यासाठी ११० रुपये मोजावे लागत आहे. अशाच प्रकारे जनरल तिकिटाअभावी प्रवाशांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे.