कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?

By Admin | Updated: December 10, 2014 00:41 IST2014-12-10T00:27:29+5:302014-12-10T00:41:01+5:30

ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली

How to call the family car alone? | कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?

कुटुंबाचा गाडा एकटीने हाकायचा कसा...?


ना मिळाली शासकीय मदत, ना कोणाचा आधार. जीवन तर जगावेच लागतेय. कर्जबाजारी झाल्याने पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आता वयोवृद्ध सासु-सासरे, स्वत:च्या दोन मुली, एक मुलगा, यांची जबाबदारी पेलायची कशी? या विवंचनेत उषा दत्ता राऊत हिचा नियतीशी संघर्ष सुरू आहे.
ही व्यथा आहे अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची. सलग तीन वर्षांपासून दुष्काळ सदृश्य स्थितीचा सामना करताना झालेली दमछाक. शेतीसाठी घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते वाढू लागले. झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना. दिवसेंदिवस कर्ज वाढूच लागले. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? यातून नैराश्य आल्याने पूस येथील दत्ता प्रभू राऊत (वय - ३६) या शेतकऱ्याने २२ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दत्ता प्रभू राऊत हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या दोन एक्कर शेतीवर तो संपूर्ण कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. शेती करताना त्याने आई-वडिलांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या उत्पन्नातून खर्चही निघेना म्हणून तो गावातच शेतमजूर म्हणून काम करू लागला. परंतु आर्थिक जुळवाजुळवीचे गणीत काही जमेना. कर्जाचे हप्ते वाढू लागले. यातूनच नैराश्य आल्याने त्याने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दत्ता राऊत याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, उषा, दोन मुली, एक मुलगा असा संसार आता उघडयावर पडला आहे. दत्ता प्रभू राऊत या शेतकऱ्याची आत्महत्या झाली या घटनेचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात कृषि विभाग, शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट, या सर्व बाबींचा अहवाल पाठविला आहे. या घटनेबाबत आपला पाठपुरावा सुरू असल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले.
शासनाला गांभीर्य नाही
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे व समस्यांकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात. त्या खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत. या संदर्भात सातत्याने अशा दुर्घटना घडूनही शासनाला गांभीर्य नाही. अशी प्रतिक्रिया कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.
पंकजा मुंडेंचा मतदारसंघ
पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी या मतदारसंघात पूस हे गाव आहे. ही दुर्घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. घटना घडल्यानंतर पंकजा यांच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र, अद्यापही पंकजा अथवा खा. प्रितम यांनी या कुटुंबियांची भेट घेण्याचे साधे औदार्यही दाखविले नाही. याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकण्यास मिळाली.

Web Title: How to call the family car alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.