‘त्या’ गृहनिर्माण संस्थेची होणार चौकशी
By Admin | Updated: May 23, 2017 00:14 IST2017-05-23T00:12:12+5:302017-05-23T00:14:32+5:30
जालना : गटविमा गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याचे आश्वासन देत अनेकांची फसवणूक करणाऱ्या उमंग सहकारी गृहनिर्माण संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे.

‘त्या’ गृहनिर्माण संस्थेची होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गटविमा गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याचे आश्वासन देत अनेकांची फसवणूक करणाऱ्या उमंग सहकारी गृहनिर्माण संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान,कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण मागे घ्यावे, असे पत्र सहाय्यक निबंधकांनी सोमवारी उपोषणकर्त्यांना दिले.
साखळी उपोषण करणाऱ्या फकिरा साळुबा वाघ यांच्यासह फसवणूक झालेल्या इतर सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. साहाय्यक निबंधकांनी संस्थेच्या नोंदणीकृत पत्यावर भेट दिली असता, कार्यालय आढळून आले नाही. संस्थेचे अध्यक्ष व सचिवांबाबत काहीच माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे उपोषणकर्त्यांनी वेळावेळी याबाबत पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही.
सहाय्यक निबंधकांनी उमंग सहकारी गृहनिर्माण संस्था इंदेवाडी या संस्थेचे रेकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांकडे पत्रव्यहार केला आहे.
सर्व माहिती उपलब्ध होताच संस्थेवर कारवाई केली जाईल. त्यामुळे कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण मागे घ्यावे, असे साहाय्यक निबंधकांनी साखळी उपोषण कर्त्यांना लेखी कळविले
आहे.