बेघर कुटुंबांना घरांची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 5, 2016 00:59 IST2016-09-05T00:39:04+5:302016-09-05T00:59:58+5:30
हणमंत गायकवाड , लातूर महानगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेसाठी समाजकल्याणच्या निकषानुसार सर्व्हे करून ३६४ बेघर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली असून,

बेघर कुटुंबांना घरांची प्रतीक्षा
हणमंत गायकवाड , लातूर
महानगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेसाठी समाजकल्याणच्या निकषानुसार सर्व्हे करून ३६४ बेघर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली असून, सहाय्यक आयुक्तांकडे ही यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने मंजुरी रखडली आहे. चढत्या क्रमांकाने लाभार्थ्यांची निवड यादी करण्यात आली असून, मनपाचा पाठपुरावा नसल्याने ३६४ बेघर कुटुंबांंना सध्या तरी घराची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्ती, कुटुंबांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०१०-११ पासून नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांचीही निवड केली जाते. लातूर महानगरपालिकेत २०१०-११ मध्ये ३०३ कुटुंबांना या योजनेत घरे मंजूर झाली. त्यापैकी २७५ घरांचे काम पूर्ण झाले असून, ३१ घरांची कामे सुरू आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर २०१५ रोजी लातूर महानगरपालिकेने समाजकल्याणच्या निकषानुसार लातूर शहरात सर्व्हे करून ३६४ लाभार्थ्यांची यादी या योजनेसाठी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठविली. मात्र निधी असताना हा प्रस्ताव पाठविला गेला नाही. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत हा प्रस्ताव अडकला आहे. ज्यांना जागा आहे परंतु, घर नाही अशा व्यक्तींचाच हा प्रस्ताव आहे. प्रस्ताव पाठवून वर्षपूर्ती होत असली, तरी अद्याप मंजुरी नाही. त्यासाठी मनपानेही पाठपुरावा केला नाही. परिणामी, या लाभार्थ्यांचे मनपा कार्यालयात खेटे सुरू आहेत.
पुण्याचा निधी लातूरला वर्ग होणार...
घरकुलाचा पुणे जिल्ह्याचा अखर्चित निधी लातूरसाठी वर्ग होणार आहे. त्यातून ३६४ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी ७ कोटी २८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. समाजकल्याणच्या आयुक्तांनी हा निधी वर्ग करण्यासंदर्भात २० जानेवारी २०१६ रोजी आदेश दिले.
मनपाचा पाठपुरावा नाही
समाजकल्याणकडे निधी आहे. परंतु, मनपाने पाठपुरावा केला नसल्यामुळे लाभार्थ्यांना घरांची प्रतीक्षा आहे. मागासवर्गीय योजनांकडे मनपाचे नेहमीच दुर्लक्ष असते, असा आरोप नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांनी केला.