निळा पुनर्वसनातील ४६९ लाभार्थ्यांना घरांचे वाटप
By Admin | Updated: July 8, 2017 00:06 IST2017-07-08T00:04:10+5:302017-07-08T00:06:31+5:30
पूर्णा : पूर्णा नदीला येणाऱ्या पूर स्थितीने वारंवार प्रभावित होणाऱ्या निळा गावची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटच्या टप्यात आली आहे.

निळा पुनर्वसनातील ४६९ लाभार्थ्यांना घरांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : पूर्णा नदीला येणाऱ्या पूर स्थितीने वारंवार प्रभावित होणाऱ्या निळा गावची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटच्या टप्यात आली आहे. ७ जुलै रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पुनर्वसनातील ४६९ लाभार्थ्यांना घरे वाटप करण्यात आली आहेत.
तालुक्यातील निळा हे गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. मागील अनेक वर्षात आलेल्या पूरस्थितीत हे गाव धोक्यात आले होते. १९६१ साली या गावातील ग्रामसभेत गावाच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २००५ साली पुन्हा हे गाव पाण्याने वेढले गेले. यावेळी जिल्हा प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत हालचाली सुरू केल्या. २००६ मध्ये परिसरातील जमीन अधिग्रहित करून पुनर्वसनाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. कधी काम सुरू तर कधी बंद होत. अखेर यावर्षी पुनर्वसनाच्या कामाला गती मिळाली. नवीन जागेतील ५६४ घरांचे काम पूर्ण झाले असून ७ जुलै रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, तहसीलदार श्याम मदनूरकर, नायब तहसीलदार वंदना मस्के यांच्या उपस्थितीत पूर्णा तहसील कार्यालयात एका कार्यक्रमाद्वारे यापैकी ४६९ लाभार्थ्यांना घर क्रमांक वाटप करण्यात आले. ताबा पत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये लोकवाटा म्हणून जमा करावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निळा पुनर्वसनाचा प्रश्न मागील ५६ वर्षांपासून प्रलंबित होता. नवीन घरे मिळत असल्याने लाभार्थ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.