४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप
By Admin | Updated: August 12, 2014 02:01 IST2014-08-12T01:35:28+5:302014-08-12T02:01:07+5:30
करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात

४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप
करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करमाड येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनाप्रसंगी केले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, शासनाने सर्व शासकीय लाभांच्या योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या ४ वर्षांत पाणंदमुक्ती अभियान रस्ते तयार झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे-येणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणात कुठल्याही दाखल्याची अडचण येऊ नये यासाठी यावर्षी इयत्ता ९ वी पर्यंतच्या ४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप करण्यात आले आहे, तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात १ कोटी ६० लाख प्रमाणपत्र वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. महा-ई-सेवा केंद्रामुळे ग्रामीण भागात ७/१२, नमुना नं. ८ व इतर प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. आ. काळे यांनी विकासाच्या दृष्टीने पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत मी तुमची मागणी मंत्रिमंडळासमोर मांडतो, असे आश्वासन दिले.
यावेळी आ. डॉ. कल्याण काळे यांनी येत्या १५ आॅगस्टला औरंगाबाद शहर व ग्रामीणसाठी वेगवेगळ्या तहसीलची घोषणा करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री थोरात यांनी दीपप्रज्वलन करून केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी केले. समाधान योजनेबाबत जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच कैलास उकर्डे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदाताई जारवाल, विलास औताडे, अभिजित देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बबनराव कुंडारे उपस्थित होते. (वार्ताहर)