तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प

By Admin | Updated: May 30, 2014 00:27 IST2014-05-29T23:27:56+5:302014-05-30T00:27:07+5:30

जालना : शहरासह जिल्ह्यातील तासन्तास विजेच्या भारनियमनाने व्यापारीपेठेतील व्यवहारासह गावोगावचे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे.

Hours of weight loss jumped daily behavior | तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प

तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प

जालना : शहरासह जिल्ह्यातील तासन्तास विजेच्या भारनियमनाने व्यापारीपेठेतील व्यवहारासह गावोगावचे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. या जिल्ह्यात शहरी व ग्रमीण भागात तासन्तास भारनियमन सुरू आहे. शहरी भागात किमान आठ तास, ग्रामीण भागात किमान १४ तास भारनियमन होते आहे. त्याशिवाय अघोषित असे भारनियमनही तासन्तास होते आहे. सरासरी शहरी भागात दहा तास तसेच ग्रामीण भागात १६ तास वीजपुरवठा होत नाही, हे विदारक सत्य आहे. भारनियमनाव्यतिरिक्त कालावधीतसुद्धा कमी दाबाने वीजपुरवठा होतो आहे. कधी उच्च दाबानेसुद्धा पुरवठा होत असून, एकूण शहरी व ग्रामीण भागात सुरळीतपणे सलग दहा ताससुद्धा वीजपुरवठा होत नाही. हे वास्तव आहे. संपूर्ण जिल्ह्यात विजेच्या भारनियमनाचे कोणतेही वेळापत्रक आता अस्तित्वात राहिले नाही महावितरण कंपनीने पूर्वी भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्याचे काही महिन्यातच तीन-तेरा वाजले. आता मनमानीपद्धतीने केव्हाही भारनियमन होते आहे. त्याशिवाय विजेचा लपंडाव सुरूच आहे. महावितरण कंपनीच्या या अंदाधुंद कारभाराविरोधात सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, कंपनीच्या कर्मचार्‍यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याचे काडीचेही सोयर-सुतक नाही. तासन्तास विजेच्या भारनियमनासह लपंडावासंदर्भात महावितरण कंपनीने आजवर एका ओळीनेही खुलासा केला नाही. किंवा माहितीसुद्धा दिली नाही. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात वीजपुरवठ्याबाबत ठणठणाट कायम आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शहरी व ग्रामीण भाग दुष्काळापाठोपाठ महागाईने होरपळून निघाला आहे. त्यास्थितीतसुद्धा महावितरण कंपनीने गेल्यावर्षी कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीचे कारण दाखवून मोठ्या प्रमाणावर वीज तोडणीची मोहिम राबविली. आताही कंपनीने संपूर्ण जिल्ह्यात मोहिम राबविण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून वसुलीची मोहीम राबविली जात असतांना कंपनीने सुरळीत वीजपुरवठ्यासंदर्भात काडीचेही प्रयत्न केले नाही. उलटपक्षी अनियमित व कमीदाबाने वीजपुरवठा होत असतांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी वरून दबाव असल्याचे कारण दाखवून नामानिराळे राहण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी) थकबाकीमुक्त भागातही वीज गूल इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या काळात भारनियमन केले जाणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु या जिल्ह्यात त्या अनुषंगाने काडीचीही अंमलबजावणी झाली नाही. उलटपक्षी परीक्षांच्या काळात तासन्तास भारनियमन सुरूच होते. या जिल्ह्यातील थकबाकीमुक्त भागांना सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, अशाही सरकारसह कंपनीनेही वल्गना केल्या. परंतु, नियमितपणे वीजबिले भरणार्‍या भागांमधून आजही तासन्तास भारनियमन होते आहे. बिले भरूनसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना कंपनीने काडीचाही दिलासा दिला नाही. रखरखत्या उन्हाने संपूर्ण जिल्हा होरपळून निघाला असतांना, कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्नच केले नाहीत. उलट सर्वसामान्य ग्राहकांना अव्वा की सव्वा बिले हातात टेकवून चेष्टाच सुरूच केली आहे. या वीजबिलांच्या दुरूस्तीसंदर्भात कंपनीने कोणतीही स्वतंत्र यंत्रणाच उभारली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वीजबिलांच्या दुरूस्तीसाठी हेलपाटे घालत आहेत.

Web Title: Hours of weight loss jumped daily behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.