अवैध वाहतुकीवर कारवाईसत्र सुरू !
By Admin | Updated: November 14, 2014 00:53 IST2014-11-14T00:38:28+5:302014-11-14T00:53:54+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील अवैध वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच परिवहन विभागासह वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र हाती घेतले आहे़ दोन्ही विभागाकडून गुरूवारी

अवैध वाहतुकीवर कारवाईसत्र सुरू !
उस्मानाबाद : जिल्ह्यातील अवैध वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच परिवहन विभागासह वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र हाती घेतले आहे़ दोन्ही विभागाकडून गुरूवारी जवळपास ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली़
उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक, अवैध प्रवाशी वाहतुकीला ऊत आला होता़ वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने बुधवारी ‘जिल्ह्यात अवैध वाहतूक जोमात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेवून परिवहन विभागाने सकाळी सात वाजल्यापासूनच कारवाई सत्र सुरू केले़
या विभागाने दिवसभरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ११ लहान व एका मोठ्या बसवर कारवाईचा बडगा उगारला़ यातील एका बसची कागदपत्रे सुरळीत असून, इतर वाहनांची कागदपत्रे व स्कूलबससाठी लागणारे नियम पाळण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ या बसेसवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे़ तर वाहतूक शाखेने शहरात सिग्नल मोडणे, दुचाकीवर तिघे बसून जाण्यासह वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या जवळपास ३५ वाहनचालकांवर कारवाई करून दंड करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कारवाईचा ‘फार्स’ नको
परिवहन विभाग व वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ या दोन्ही विभागांनी सुरू केलेली कारवाईची मोहीम केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात बोकाळलेली अवैध प्रवाशी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह मालकांना परिवहन विभागाने यापूर्वी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, अनेकांनी या सूचनांचे पालन केले नसल्याचे दिसत आहे़ प्रारंभी स्कूलबसवर कारवाई करण्यात येत असून, लवकरच अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरूध्दही कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़