तासभर एसटीचा चक्का जाम
By Admin | Updated: December 17, 2015 00:15 IST2015-12-17T00:03:00+5:302015-12-17T00:15:05+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या महिला वाहकावर पोलिसाने हात उचलल्यामुळे चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त करून मध्यवर्ती बसस्थानकात तासभर एस. टी. बसेस रोखून धरल्या.

तासभर एसटीचा चक्का जाम
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या महिला वाहकावर पोलिसाने हात उचलल्यामुळे चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त करून मध्यवर्ती बसस्थानकात तासभर एस. टी. बसेस रोखून धरल्या. जोपर्यंत संबंधित पोलिसाला अटक होणार नाही, तोपर्यंत बसेस जाऊ देणार नाही, असा पवित्रा चालक- वाहकांनी घेतल्याने बसस्थानकात तणाव निर्माण झाला.
मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी सायंकाळी सुट्या पैशाच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याने महिला वाहकास मारहाण केली. हा वाद सुरू असताना चालक-वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांच्या उपस्थितीत एका महिला कर्मचाऱ्यास पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने चालक-वाहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत सदर पोलीस कर्मचाऱ्यास अटक होणार नाही, तोपर्यंत बसस्थानकातून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा एस. टी. कर्मचाऱ्यांनी घेतला. मोठ्या संख्येने चालक-वाहक एकत्र आले आणि तासभर बसस्थानक, डेपो बंद ठेवला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील बसस्थानकात दाखल झाले. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर बसस्थानकातील परिस्थिती पूर्वपदावर आली. वादानंतर चालक-वाहकांनी बसेस जाऊ दिल्या नाहीत.