मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालणार हॉटेल्स अन् बार...
By Admin | Updated: December 28, 2015 23:24 IST2015-12-28T23:08:31+5:302015-12-28T23:24:34+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरनिमित्त करण्यात येणाऱ्या ओल्या पार्ट्या, अनियंत्रित मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाईवर पोलिस प्रशासनासह

मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालणार हॉटेल्स अन् बार...
राजकुमार जोंधळे , लातूर
जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरनिमित्त करण्यात येणाऱ्या ओल्या पार्ट्या, अनियंत्रित मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाईवर पोलिस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची करडी नजर राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ६९ हजार एकदिवसीय मद्यसेवन परवाने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात १२० पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर आहेत.
अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल्स, परिमिटरुम, बार आणि धाबे सजली आहेत. नववर्षाच्या स्वागताची पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. ३१ डिसेंबर रोजी १८ वर्षापेक्षा ज्यांचे वय अधिक आहे, अशांना एकदिवसीय मद्यसेवन परवाने देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेकायदेशीर मद्याचे सेवन करु नये, यासाठी पथकांमार्फत तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील उदगीर, जळकोट, अहमदपूर आणि रेणापूर तालुक्यांच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
या परिसरात परजिल्हा, परराज्यातून येणारी देशी-विदेशी दारु यावर पायबंद घालण्यासाठी या विभागाच्यावतीने नांदेड-लातूर जिल्ह्याचे संयुक्त पथक आणि एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे. बेकायदा, बनावट आणि अयोग्य मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे टाकत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.