हॉटेलचालकावर रोखले पिस्तूल; दोघे गजाआड
By Admin | Updated: March 24, 2017 00:06 IST2017-03-24T00:01:02+5:302017-03-24T00:06:01+5:30
बीड : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी केली तेव्हा दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली.

हॉटेलचालकावर रोखले पिस्तूल; दोघे गजाआड
बीड : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी केली तेव्हा दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. हॉटेल मालकाच्या पत्नीलाही धमकावले. ही घटना बुधवारी रात्री शहरातील मित्रनगर भागातील आशीर्वाद हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक शिराळेसह पाचजणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
किरण उत्तमराव उबाळे यांचे मित्रनगर भागात हॉटेल आहे. रात्री साडेआठ वाजता माजी नगरसेवक अशोक शिराळे, अमोल शिराळे, सतीश क्षीरसागर, रत्नदीप गोरे, अक्षय आठवले हे तेथे आले. त्यातील काहींनी चहा तर काहींनी थंडपेय घेतले. सिगारेट व अंडे खरेदी करुन ते पैसे न देताच बाहेर पडू लागले. याचवेळी हॉटेल मालक उबाळे यांनी त्यांना बिलाची मागणी केली. तेव्हा या सर्वांनी ‘तुझे कशाचे पैसे’ असे म्हणत थेट शिवीगाळ सुरु केली. रत्नदीप गोरे याने अंगाला मिठी मारून लाथाबुक्याने मारहाण केली तर अशोक शिराळे याने तोंडावर बुक्की मारून डोक्याला पिस्तूल लावत जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी अक्षय आठवले याने उबाळे यांच्या पत्नी छाया यांच्यासमोर जावून पिस्तूल दाखवत धमकावले. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या गल्ल्यातील चार हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उबाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पाच जणांविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात दरोडा व आर्म अॅक्टअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. (प्रतिनिधी)