वसतिगृहांची चौकशी होणार
By Admin | Updated: June 14, 2017 00:28 IST2017-06-14T00:10:05+5:302017-06-14T00:28:33+5:30
नांदेड : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या वसतिगृहांची परिपूर्ण चौकशी करून सदर अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी दिले आहेत़

वसतिगृहांची चौकशी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या वसतिगृहांची परिपूर्ण चौकशी करून सदर अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी दिले आहेत़
जिल्हा परिषदेत मंगळवारी समाजकल्याण समितीची बैठक सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ या बैठकीत प्रांरभी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला़ या आढाव्यात शासनाच्या सर्व योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असेही सभापतींनी सुचित केले़ त्याचवेळी जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे जवळपास २०० वसतिगृह चालतात़ या वसतिगृहांची नेमकी अवस्था समोर येण्यासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सर्व वसतिगृहांची परिपूर्ण तपासणी करावी़ त्यामध्ये विद्यार्थीसंख्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, भौतिक अवस्था आदी सर्व बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे़ त्याचवेळी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेवून ज्या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे अशा गावांमध्ये आऱ ओ़ प्लॅन्ट बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही त्या म्हणाल्या़
आगामी शैक्षणिक वर्षात वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत रोपटे देऊन करावे अशी अभिनव सूचनाही सभापतींनी दिली़ या बैठकीस समिती सदस्या भाग्यश्री साबणे, संगीता वारकड, संगीता अटकोरे, विजयश्री कमठेवाड, शकुंतला कोलमवाड, सुंदराबाई मरखेले, चंद्रसेन पाटील, गंगाप्रसाद काकडे, समाजकल्याण अधिकारी नागोराव कुंभारगावे आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, याच बैठकीत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याचा सभापती निखाते व समिती सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
दरम्यान, या सभेत जि.प.च्या दलित वस्ती निधीबाबत चर्चा न झाल्याने मावळत्या सभागृहातील सदस्यांची निराशा झाली़ जिल्हा परिषदेच्या तब्बल २२ कोटींच्या कामांना पालकमंत्री खोतकर यांनी स्थगिती दिली आहे़ जि़प़ ने या कामांना क्लिनचीट दिली असली तरी अद्यापही पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठली नसल्याने त्या कामाचे काय याकडे उत्सुकता लागली आहे़