अल्पसंख्याक मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह

By Admin | Updated: August 8, 2014 00:30 IST2014-08-07T23:58:04+5:302014-08-08T00:30:00+5:30

लातूर : अल्पसंख्याक मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यांत

Hostels in every district for minority girls | अल्पसंख्याक मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह

अल्पसंख्याक मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह



लातूर : अल्पसंख्याक मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यांत अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शिवाय, १२० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या तंत्रशिक्षणाची सोयही प्रत्येक जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. लातुरात प्रवेश सुरू झाला असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री महंमद अरीफ (नसीम) खान यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
लातूर येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी झाले. याप्रसंगी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत अल्पसंख्याक मंत्री खान म्हणाले, डॉ. झाकीर हुसेन मदरसा योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबर बेसिक शिक्षण दिले जाईल, त्या संस्थांना २ ते ५ लाखांपर्यंतचा निधी राज्य शासन देत आहे. लातूर जिल्ह्यात अशा १५ मदरशांनी या योजनेत प्रस्ताव दाखल करून मदत घेतली आहे. राज्यभरात ४२५ मदरशांनी धार्मिक शिक्षणाबरोबर बेसिक शिक्षण सुरू केले आहे. त्याला राज्य शासनाने मदत देण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु, सध्या प्रमाणपत्रांची अडचण होत असल्याने टीसीच्या आधारे तात्काळ जात प्रमाणपत्र द्यावेत, असे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल पाचशे कोटींवर गेले आहे. या महामंडळाअंतर्गत विविध कर्ज योजना सुरू करण्यात आले असून, त्याचा लाभ लाभार्थी घेत आहेत. २००८-०९ मध्ये राज्य शासनाने अल्पसंख्याक विभागाची स्थापना केली आणि या विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याअनुषंगाने या विभागामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. वसतिगृह, तंत्रशिक्षण, बेसिक शिक्षण, शिष्यवृत्ती आणि कर्ज योजना राबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचेही ते म्हणाले.
पत्रपरिषदेला राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Hostels in every district for minority girls