वसतिगृहात सुविधांची वानवा
By Admin | Updated: February 19, 2015 00:43 IST2015-02-19T00:32:07+5:302015-02-19T00:43:34+5:30
जालना : समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या येथील मुलींच्या वसतिगृहात अनेक सुविधा मिळत नसल्याने बुधवारी तेथील ५० विद्यार्थिनींनी

वसतिगृहात सुविधांची वानवा
जालना : समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या येथील मुलींच्या वसतिगृहात अनेक सुविधा मिळत नसल्याने बुधवारी तेथील ५० विद्यार्थिनींनी समाजकल्याण उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण केले. उपायुक्त बी.एन. वीर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले.
जिल्ह्यात मुलांचे ६ आणि मुलींचे ३ असे ९ वसतिगृह आहेत. परंतु बहुतांश वसतिगृहात पूर्णवेळ गृहपाल नाही. वर्षभरापासून मुलींचे वसतिगृह गृहपालाविना सुरू असल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश अद्यापही देण्यात आले नाहीत. वैद्यकीय , अभियांत्रिकी पदवी, पदविकाधारक विद्यार्थिनींसाठी येणारे पुस्तके, भत्ते देण्यात आलेले नाहीत. मुलींसाठी आलेला संगणकही धूळखात आहे. त्याचा वापर मुलींना करू दिला जात नाही. ऐन परीक्षेच्या काळात आम्हाला या सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी आम्हाला उपोषण करावे लागत असल्याची खंत विद्यार्थिनींनी व्यक्त केली. यामुळे आमचा अभ्यासावर परिणाम होत असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
‘पूर्णवेळ महिला गृहपाल द्या’
शासनाच्या २६ जुलैच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, वसतिगृहातील जेवणाचा दर्जा सुधारावा, गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले सोलर हिटर तात्काळ सुरू करावे, गणवेशासाठी आलेले पैसे विद्यार्थिंनीना देण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रथोमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणाला एसएफआयने पाठिंबा दिला होता. त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले निवेदनावर अनिल मिसाळ, मंजुश्री कबाडे, शिवाजी तोगरवार, रेखा काकडे, बाबासाहेब पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याबाबत समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.एन. वीर म्हणाले, विद्यार्थिनींनी केलेल्या मागण्यांबाबत आपण समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्ह्यात तीन गृहपाल देण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण झाल्यास मुलींच्या वसतिगृहास तात्काळ पूर्ण वेळ महिला गृहपाल देण्यात येईल. याशिवाय सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.