वसतिगृहाच्या प्रवेशाचा घोळच घोळ
By Admin | Updated: August 14, 2014 01:55 IST2014-08-14T01:13:45+5:302014-08-14T01:55:45+5:30
गजानन वानखडे , जालना जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सुरु होऊन दोन महिने उलटले. परंतु समाज कल्याण विभागासह खाजगी एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे शासकीय वसतिगृहातील शेकडो

वसतिगृहाच्या प्रवेशाचा घोळच घोळ
गजानन वानखडे , जालना
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सुरु होऊन दोन महिने उलटले. परंतु समाज कल्याण विभागासह खाजगी एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे शासकीय वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्णत: रखडली आहे.
जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे एकूण ९ शासकीय वसतिगृह आहेत. त्यात मुलांचे ६ आणि मुलींच्या ३ वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहात एससी, एसटी, ओबीसी, आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात आहे.
जिल्ह्यात बदनापूर, घनसावंगी, अंबड, भोकरदन येथील या वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेकरीता गुणवत्तेनुसार आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. प्रवेश प्रक्रिया २३ जून ते १० आॅगस्ट पर्यंत राबविण्यात आली.
जिल्ह्यातील ७५५ जागेसासाठी ११०७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईनद्वारे अर्ज दाखल केले. समाज कल्याण विभागाने गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाईल, हे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणेच अर्ज मागविल्या नंतरची संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. अर्ज दाखल केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनीही ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन यादी आज न उद्या प्रसिध्द होईल म्हणून प्रतीक्षा सुरु केली. सरकारी यंत्रणेने १३ आॅगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर होईल, असे स्पष्ट केले. पुन्हा याच यंत्रणेने घुमजाव करीत १३ ऐवजी १९ आॅगस्ट रोजी यादी जाहीर करु, अशी घोषणा केली.
वास्तविकता शाळा महाविद्यालय सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी आॅनलाईन प्रक्रिया पूर्णत: रखडली आहे. पुण्याच्या मास्टेक कंपनीचे सॉफ्टवेअर अद्यापही अद्यावत न झाल्याने पात्रता यादीच झळकली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आत्तापर्यत शालेय विद्यार्थ्यांचे ११९ अर्जापैकी शहरासह तालुक्याच्या वसतिगृहात फक्त ३३ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील समाजकल्याणची विभागाच्या वसतिगृहाची या वर्षीपासून आॅनलाईन प्रक्रिया करण्याचे ठरले. त्यानंतर पुण्याच्या मास्टेट कंपनीला याची सर्व जबाबदारी देण्यात आली परंतु विभागाच्या बेवसाईट अपडेट नसल्याने किती विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले? त्यातील गुणानुक्रम कसा? याची काहीच माहिती विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कळाली नाही. परिणामी विद्यार्थ्यासह पालकवर्गात नाराजीचे वातावरण आहे.
आपला प्रवेश निश्चित आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्यातील पालक रोज समाजकल्याण उपायुक्त कार्यालयात चकरा मारत आहेत.
परंतु आॅनलाीईनची सर्व माहिती डायरेक्टर समाजकल्याण पुणे यांच्याकडे पाठविण्यात आल्याने स्थानिक अधिकारी वरिष्ठांकडे बोट दाखवून हात वर करीत आहेत.
जिल्ह्यात वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया ७५५ पर्यंंत क्षमता आहे त्यामंध्ये आधीच प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३९ आहे. त्यामुळे जिल्ह्यात फक्त ४१६ जागा शिल्लक आहे. ११०७ आलेल्या अर्जापैकी शालेय विद्यार्थ्याचे ११९ अर्ज आले होते, त्यापैकी फक्त ३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित विद्यार्थ्याना प्रतीक्षा आहे.उर्वरित विद्यार्थ्यांना कॉललेटर पाठाविण्यात आले आले असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.