पीककर्ज वाटपाचे घोडे अडलेलेच
By Admin | Updated: June 10, 2016 00:05 IST2016-06-09T23:56:28+5:302016-06-10T00:05:56+5:30
औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे.

पीककर्ज वाटपाचे घोडे अडलेलेच
औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. आतापर्यंत विभागात बँकांकडून एकूण उद्दिष्टाच्या केवळ २४ टक्के एवढेच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १५ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे.
सतत चार वर्षांच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या त्याच्याकडे पेरणीसाठीही पैसे नाहीत. म्हणूनच खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना दिलेले आहेत. विभागातील बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही ठरवून देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियोजनानुसार मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून ९,८६३ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आलेले होते. पेरणीच्या आधी पीककर्ज मिळाले तर पेरणीचा खर्च भागविता येईल म्हणून मराठवाड्यातील शेतकरी संबंधित बँकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. मात्र, बँकांकडून त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. त्याविरोधात महिनाभरात मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही केली; परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता मान्सून चोवीस तासांत महाराष्ट्राच्या सीमेवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पेरणीसाठी शेतही तयार आहे. पण अजूनही (पान ५ वर)
विभागात आतापर्यंत उद्दिष्टाच्या २४ टक्के इतके पीककर्ज वाटप झाले आहे. बँकांकडून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
- राजेश सुरवसे, विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद